Headlines

छठ पूजेच्या नावाखाली भाजप संघर्ष पेटवतोय, त्यांच्या सापळ्यात अडकू नका:उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच हा आटापिटा- राज ठाकरेंचा आरोप




महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या स्वार्थासाठी भाजप छठ पूजेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच, ‘भाजपला कामे दाखवून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यामुळे दोन गटांत संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर ते निवडणुका जिंकतात,’ असा स्फोटक दावाही राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. ‘यूपी निवडणुकांसाठी महाराष्ट्रात वाद पेटवण्याचा डाव’ राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, भाजप आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात छठ पूजेचा मुद्दा वापरून संघर्ष कसा निर्माण होईल, यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी मनसेने बंद पाडली. पण तरीही भाजपला अपेक्षित असलेला संघर्ष उभा राहत नाहीये, याची त्यांना खंत आहे. हा सगळा आटापिटा आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी सुरू आहे. भाजपच्या ‘थिंक टँक’ची बौद्धिक क्षमता कमकुवत झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ‘महाराष्ट्र एकाच उद्योगपतीला विकला’ राज ठाकरे म्हणाले, भाजपने देशाची आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूंनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे. आपले महाराज आणि मावळे जिथे नांदले, तो सह्याद्रीही यांनी पोखरायला सुरुवात केली आहे. जंगले आणि जमिनी त्या उद्योगपतीला दिल्या जात आहेत.” मराठी माणसाला ‘गनिमी काव्या’ची आठवण मराठी माणसाला सतर्कतेचा इशारा देताना राज ठाकरे म्हणाले, “माझी मराठी माणसांना विनंती आहे की, त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. भाजपच्या स्वार्थासाठी त्यांच्या सापळ्यात आपण अडकायचे नाही. आपण शिवरायांचा गनिमी कावा लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी आणि कसे उत्तर द्यायचे, हे आपण ठरवू. योग्य वेळी आपण आपला राग बाहेर काढला पाहिजे.” ‘शांत आहोत म्हणजे …’ राज ठाकरे म्हणाले, पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच, तर ‘शांत आहोत म्हणजे कमजोर नाही’, हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि राज्याचे सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे. उत्तर भारतीय आणि गुजराती समाजानेही समजून घ्यावे की, भाजप फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्हाला आमच्या विरोधात उभे करत आहे. जर त्यांच्यात सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल, तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे आणि इथे मरहट्टे राहतात!” मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी.. भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना – भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! ——————— हेही वाचा.. मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या?: धमकावणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाचा बोजा आणि वसुलीसाठी लावण्यात आलेल्या तगाद्याला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सावंगा गुरव येथे घडली आहे. संदीप अवधूत करडे (रा. शिलोड) असे या शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे सावंगा गुरवसह शिलोड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक घटनेची दखल घेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *