![]()
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून तापलेल्या राजकारणाचे पडसाद आता राज्य पातळीवर उमटताना दिसत आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या घोषणेचा पुनरुच्चार करत, मुख्यमंत्र्यांनी मला आदेश द्यावेत, सतेज पाटलांचे साम्राज्य पाच मिनिटात उद्ध्वस्त करतो, हे विधान कायम ठेवले. तसेच, सतेज पाटील यांना कायद्यानेच वेसण घालणार असून, खासगी शिक्षणचालकांच्या मनमानी फी विरोधात लवकरच कायदा आणणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सतेज पाटील आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. या काळात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टोकाची टीका केली गेली. अखेर गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचा संचालक विराजमान झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर जाहीररीत्या हल्लाबोल केला होता. त्याच राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा कायद्याचा बडगा उगारण्याचा इशारा दिल्याने, या राजकीय वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कोणी वाकडे बोलले तर सहन करणार नाही. त्यामुळेच सतेज पाटलांवर उद्ध्वस्त केल्याची टीका केली. खरे सांगायचे तर मी काही केले नाही, सुप्रीम कोर्टानेच शिक्षण संस्थाचालकांची झोप उडवली. एका विद्यार्थिनीच्या याचिकेनंतर कोर्टाने मोठी प्रश्नावली दिली आहे. त्यावर दिवाळी संपल्यानंतर उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठ चालकांची झोप उडणार आहे हे नक्की. पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, एफआरए कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून सतेज पाटील सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचे. येत्या मार्च महिन्यात एफआरए कायदा आणणार आहे. त्या माध्यमातून शिक्षणचालक विद्यार्थ्यांकडून जी फी घेतात त्यावर सरकारचे नियंत्रण असेल. कुठे मनमानी फी वसुली सुरू असेल तर त्यावर सरकार कारवाई करणार. डी वाय पाटील महाविद्यालयाचा सातबारा तपासा, तो कोणाच्या नावावर आहे हे समोर येईल, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना इशारा दिला आहे.
Source link
'मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत, सतेज पाटलांचे साम्राज्य पाच मिनिटांत उद्ध्वस्त करतो':चंद्रकांत पाटलांचा पुन्हा इशारा, म्हणाले- त्यांना कायद्यानेच वेसण घालणार