Headlines

कोल्हापूरनंतर आता सोलापूरमध्येही ऊसदरासाठी रणशिंग:राजू शेट्टींच्या नेतृत्वात 1 लाख शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार




ऊसदराच्या प्रश्नावरून राज्यातील साखरपट्ट्यात आंदोलनाची धग वाढू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता आंदोलनाची दिशा सोलापूर जिल्ह्याकडे वळली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल किमान 3,500 रुपये मिळावी, या मागणीसाठी शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीवर कारखानदार आणि जिल्हा प्रशासनाने 15 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा 16 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर तब्बल 1 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी तयारी सुरू केली आहे. गावोगावी बैठका घेतल्या जात असून शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा, करमाळा, सांगोला आणि बार्शी या तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अधिक तापण्याची चिन्हे आहेत. 3,500 + 100 + 200 रुपये, शेट्टींचे कारखानदारांसमोर दराचे सूत्र सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 3,500 रुपये द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांची मागणी केवळ पहिल्या उचलीपुरती मर्यादित नाही. यासाठी 3,500 + 100 + 200 रुपये असे दराचे सूत्र मांडण्यात आले आहे. या सूत्रानुसार, गळीत हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून 3,500 रुपये मिळावेत. त्यानंतर संबंधित साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर आणखी 100 रुपये द्यावेत. तसेच पुढील वर्षभर साखरेचा दर प्रतिक्विंटल 4,500 रुपयांच्या पुढे गेल्यास, पुढील ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना अतिरिक्त 200 रुपये देण्यात यावेत, अशी मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,200 रुपयांचा दर मिळत असताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3,500 रुपयांची पहिली उचल देण्यात कारखानदारांना अडचण काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. उत्पादन खर्च, शेतीसाठी लागणारे वाढते साहित्य, मजुरी आणि वाहतूक खर्च यांचा विचार करता शेतकऱ्यांना योग्य दर मिळणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी एकवटले सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून ऊसदराचा प्रश्न चर्चेत असतो. मात्र, यंदा शेतकऱ्यांनी या प्रश्नावर एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. राजकीय पक्षांचे आणि जातीपातीचे झेंडे बाजूला ठेवून केवळ शेतकरी म्हणून एकत्र येत असल्याची भावना अनेक ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे. साखर कारखानदारांकडून दर निश्चित करताना शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा केवळ निवेदन देऊन किंवा चर्चेतून प्रश्न सुटण्याची वाट न पाहता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गावोगावी जाऊन बैठका घेत आहेत. मोर्चासाठी शेतकऱ्यांची नोंदणी, जनजागृती आणि संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढण्याचे आवाहन दरम्यान, राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि जिल्हा प्रशासनाला 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. या कालावधीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. कारखानदार आणि प्रशासनाने दिलेल्या मुदतीत निर्णय न घेतल्यास 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कारखानदारांकडे आता निर्णय घेण्यासाठी मर्यादित वेळ शिल्लक आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना मान्यता मिळणार की आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मोर्चात एक लाख शेतकरी सहभागी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याने प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील आंदोलनाच्या यशानंतर सोलापूरमध्येही अपेक्षा वाढल्या यंदाच्या ऊसदर आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली होती. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तब्बल 61 तास रोखून धरला होता. या आंदोलनामुळे राज्यातील ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आला. अखेर झालेल्या चर्चेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामासाठी एकूण 4,200 रुपये दर देण्याचे निश्चित झाले. त्यामध्ये पहिली उचल 3,900 रुपये मिळणार आहे. या आंदोलनाच्या यशामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. कोल्हापुरात शेतकऱ्यांनी एकजुटीच्या जोरावर दराचा प्रश्न मार्गी लावला, तर सोलापूरमध्येही तशीच एकजूट दाखवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरातील आंदोलनानंतर आता सोलापूरमध्ये ऊसदराचा संघर्ष कोणते वळण घेणार, याकडे राज्यातील साखर उद्योग आणि शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…………. अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार?:प्रतिलिटर 2 की 4 रुपयांची दरवाढ होणार, नवे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिले महत्त्वाचे संकेत सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूध संघाकडूनही दुधाच्या दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोकुळच्या दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवायचे की 4 रुपयांनी, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, येत्या बुधवार किंवा गुरुवारपर्यंत दूध दरवाढीबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *