Headlines

महादेव बेटिंग ॲपचे नागपूरपर्यंत जाळे:सीबीआयचे 6 राज्यांत 33 ठिकाणी छापे, लाइव्ह बेटिंग पॅनल उद्ध्वस्त; चंद्राकरच्या चौकशीतून नेटवर्कचा उलगडा




महादेव ऑनलाइन बुक या अवैध ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशव्यापी कारवाई केली आहे. सहा राज्यांतील ३३ ठिकाणी एकाच वेळी झडती घेण्यात आली. यात नागपूरचाही समावेश असून बेटिंग पॅनल चालवणाऱ्या ऑपरेटर्सच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव बेटिंग ॲपसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. महादेव बेटिंग ॲपसाठी गुंतवणूकदार शोधणे आणि त्यांच्याकडून घेतलेले पैसे दिलेल्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम एजंट करीत होता. त्या मोबदल्यात त्याला कमिशन मिळत होते अशी माहिती सूत्रांनी दिली. पंजाबमधील अमृतसर, दिल्ली, राजस्थानमधील नागौर व धौलपूर, मध्य प्रदेशातील भोपाळ व इंदूर, छत्तीसगडमधील रायपूर व दुर्ग, गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा व सुरत तसेच महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणांवरून जप्त कागदपत्रांमध्ये इतरांच्या नावाने उघडलेली किंवा भाड्याने घेतलेली बँक खाती व हवाला व्यवहारांचे पुरावे मिळाल्याचे सीबीआयने स्पष्ट केले. महादेव ॲपचा प्रमुख प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या चौकशीतून मिळालेली माहिती कारवाईसाठी महत्त्वाची ठरली. ओमानमधून प्रत्यार्पणानंतर सीबीआयने १ नोव्हेंबरला त्याला अटक केली. रायपूरच्या न्यायालयाने त्याला ८ दिवसांची कोठडी दिली होती. परदेशातून मुख्य नियंत्रण, भारतात पॅनलचे जाळे या बेटिंग प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यालय परदेशातून चालवले जात होते. भारतात फ्रँचायझी पद्धतीने पॅनल ऑपरेटर्सचे जाळे उभारण्यात आले होते. हे ऑपरेटर्स ग्राहकांना बेटिंगसाठी आयडी उपलब्ध करून देत, त्यांच्याकडून पैशांचे व्यवहार स्वीकारत आणि अन्य व्यक्तींच्या नावावरील बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करीत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *