Headlines

भिंतीला तडे जाण्याची भीती:वाकी धरणापासून अवघ्या दहा मीटरवरच ब्लास्टिंगचा प्रयत्न, जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह




इगतपुरी तालुक्यातील वाकी धरणापासून अवघ्या दहा मीटर अंतरावर ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न झाल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्फोटांमुळे धरणाच्या संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काम थांबवले. ज्ञानेश्वर गटकळ, सपन परदेशी आणि कोकणे या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत ब्लास्टिंगचे काम रोखले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य हानी टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. धरणापासून इतक्या कमी अंतरावर ब्लास्टिंगसारखे संवेदनशील काम कोणाच्या परवानगीने सुरू करण्यात आले, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. धरण परिसरातील पाणीपुरवठा, शेती आणि नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. संबंधित काम श्री हरी असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर या कंपनीमार्फत सुरू असल्याची माहिती आहे. धरण परिसरात ब्लास्टिंग करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक तपासणी, सुरक्षिततेचे निकष आणि संबंधित विभागांच्या परवानग्या घेणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात परवानगीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरण क्षेत्रात केवळ प्रकल्पासाठी परवानगी दिली असून ब्लास्टिंगसाठी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित कंपनीला नोटिसा बजावून काम बंद करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली. त्यामुळे परवानगी नसताना धरणाजवळ ब्लास्टिंगचा प्रयत्न कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. सुरक्षा निकष धाब्यावर धरण परिसरात ब्लास्टिंग करण्यासाठी केवळ प्रकल्पाची परवानगी पुरेशी नसते. जलसंपदा विभागाची पूर्वपरवानगी, तांत्रिक सर्वेक्षण, भूगर्भाची तपासणी आणि ब्लास्टिंगमुळे निर्माण होणाऱ्या कंपनांचे मोजमाप आवश्यक असते. धरणाचा पाया, भिंती आणि जलाशयाच्या संरचनेवर होणाऱ्या परिणामांचा तज्ज्ञांकडून अभ्यास करणेही गरजेचे आहे. ब्लास्टिंगदरम्यान सिस्मोग्राफच्या साहाय्याने कंपनांची नोंद ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे दहा मीटर अंतरावर ब्लास्टिंगचा प्रयत्न करताना या निकषांचे पालन झाले होते का, याची तांत्रिक चौकशी करून अधिकृत अहवाल जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. ब्लास्टिंगला कोणतीही परवानगी दिलेली नाही ^धरण क्षेत्रामध्ये आम्ही केवळ प्रकल्पासाठी परवानगी दिली आहे. ब्लास्टिंगसाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. संबंधित कंपनीला नोटिसा बजावण्यात आल्या असून काम बंद करण्यात आले आहे. – रीतेश जाधव, उपअभियंता, पाटबंधारे विभाग नाशिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *