![]()
राहुल गांधी यांनी केलेला फोन टॅपिंगचा आरोप खरा आहे. एका बाजूला राजकीय विरोधक आणि पत्रकारांच्या विरोधात जी यंत्रणा वापरली जाते, तीच सगळी यंत्रणा अतिरेकी आणि गुन्हेगारांच्या विरोधात वापरली तर सरकारचे आणि देशाचे भले होईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातसुद्धा हे होत होते, विधानसभेत नाना पटोले यांनी नावेसुद्धा वाचून दाखवली होती. आदित्य ठाकरे म्हणाले की, ऑपरेशन टायगर किंवा कोणतेही ऑपरेशन करा, पण महाराष्ट्राचे जे तुम्ही हाल केले आहेत, त्याकडे लक्ष द्या. राज्यात पाणीटंचाई आणि प्रदूषण वाढले आहे, तसेच उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. पक्षफोड आणि वृक्षतोड सोडून काहीतरी कामे करा. भाजपकडून सर्व काही खासगीकरण करण्यात येत आहे. एक दिवस हे सर्व अदानींच्या नावे होईल. महत्त्वाचे विषय मागे पडताय आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, छठपूजेवरून कुठेही वाद नाही; ज्यांना आरोप-प्रत्यारोप वाढवायचे आहेत, ते या गोष्टी करत आहेत. यांना केवळ मुंबईला अस्थिर ठेवायचे आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात एका समाजाच्या विरोधात दुसरा समाज, मराठी विरुद्ध अमराठी असे वाद भाजपकडून लावले जात आहेत. हे सर्व होत असताना महागाई, एसआयआर आणि इतर असंख्य महत्त्वाचे विषय मागे पडत आहेत. भाजप कधीही महिलांना पुढे येऊ देणार नाही आदित्य ठाकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल भाजपकडून अफवा पसरवल्या जात आहेत. शरद पवार यांच्या पक्षाकडून असे कुठलेही विधान देण्यात आलेले नाही, मग त्यांच्यावर संशय घेण्याचा प्रश्नच कुठे येतो? महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले आहे, ते तात्काळ लागू केले पाहिजे. ते डिलिमिटेशनसोबत का जोडले जात आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सरकारने 2029 पासून महिला आरक्षण लागू करावे, पण भाजप कधीही महिलांना पुढे येऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. शिंदेंसोबतच्या लोकांची भाजपकडून गळचेपी आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे लोक गेले आहेत, त्यांची भाजपकडून गळचेपी सुरू झाली आहे. म्हणून त्यांना वाटते की नाव कमवायला पाहिजे, त्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत ते उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांनी राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे. राज्यात अतिशय खराब वातावरण असताना आपण राजकारणात वेळ वाया घालवू नये. राज्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे, त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. प्रदूषण वाढत असताना केंद्रीय पर्यावरण मंत्री नेमके आहेत कुठे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. सरकार आता गोकुळनंतर शाळेतील क्लास मॉनिटरसुद्धा वरून आणणार आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी सरकारला लगावला आहे.
Source link
ऑपरेशन टायगरपेक्षा राज्यातील पाणीटंचाई-प्रदूषणाकडे लक्ष द्या:मुंबईला अस्थिर करण्यासाठी भाजपकडून मराठी विरुद्ध अमराठी वादाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे