Headlines

12 नामांकित वस्त्रोद्योग कंपन्यांमधून 4500 कोटींची होते वार्षिक उलाढाल:नांदगाव पेठ एमआयडीसीतील धागा आणि कापड जातो सातासमुद्रापार




अमरावतीची ओळख आतापर्यंत कापूस उत्पादक प्रदेश म्हणून होती. मात्र आता याच जिल्ह्यातील नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये तयार होणारा धागा आणि कापड थेट जपान, अमेरिका, श्रीलंका, तैवानसह विविध देशांच्या बाजारपेठेत पोहोचत आहे. नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीने वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नामांकित कंपन्यांची उपस्थिती, चार ते साडेचार हजार कोटींची वार्षिक उलाढाल आणि सुमारे १५ हजार कामगारांच्या रोजगाराचा अंदाज यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यासह विदर्भाच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे केंद्र बनत आहे. मात्र, या जागतिक भरारीत स्थानिक अर्थव्यवस्थेचा वाटा किती, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील टेक्स्टाईल पार्क आता केवळ कापडनिर्मितीचे केंद्र राहिलेले नाही, तर जागतिक वस्त्रोद्योगाच्या पुरवठा साखळीतील महत्त्वाचा दुवा बनत आहे. येथे तयार होणारा धागा आणि कापड देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशातही पाठवले जात आहे. त्यामुळे स्थानिक औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०१४ पासून या परिसरात वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादन सुरू झाले. मात्र, २०२३ नंतर उद्योगांना अधिक गती मिळाल्याची माहीती कापड उद्योगाशी संबधित अभ्यासकांनी दिली आहे. सध्या येथे १२ नामांकित कंपन्यांसह लहान स्वरूपाचे काही उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगवाढीमुळे अमरावती जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेत वाढ झाली असली, तरी त्याचा लाभ प्रत्यक्ष जिल्ह्यातील व परिसरातील जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थेट मिळणे गरजेचे आहे. या कापूस उत्पादक जिल्ह्यांतील शेतकरी, उद्योजक आणि कुशल तरुणांना या औद्योगिक मूल्यसाखळीशी जोडता येऊ शकते. मात्र, मोठी उलाढाल आणि निर्यात यांच्याबरोबर स्थानिक कच्चा माल, पूरक उद्योग आणि रोजगारनिर्मिती यांची सांगड घालणे आवश्यक आहे. अन्यथा जागतिक बाजारपेठेत पोहोचणाऱ्या उत्पादनाचा अर्थव्यवस्थेला मिळणारा लाभ मर्यादित राहू शकतो. नांदगाव पेठने जागतिक बाजारपेठेचे दार उघडले आहे. चार ते साडेचार हजार कोटींची उलाढाल ‘सियाराम’चे सीओओ आणि अमरावती टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्रकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव पेठ टेक्स्टाईल पार्कमधील कंपन्यांची वार्षिक उलाढाल सुमारे चार ते साडेचार हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. उद्योग क्षेत्रातील विविध कंपन्या आणि संबंधित आस्थापनांमध्ये १५ हजार कामगार कार्यरत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. लिनन कापडासाठी आवश्यक धागा निर्मितीवर दिला भर सियाराम, गोल्डन फायबर, रेमंड, दामोदर, श्रीधर, सूर्यलक्ष्मी, गुरुलक्ष्मी, डव्ह, टेक्नोक्राफ्ट यांसह अन्य काही उद्योगसमूहांची उपस्थिती या औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करते. या औद्योगिक क्षेत्रात एकाच प्रकारचे उत्पादन होत नाही. गोल्डन फायबरमध्ये लिनन कापडासाठी आवश्यक धाग्याच्या निर्मितीवर भर आहे. सियाराममध्ये इंडिगो प्रकारचे कापड आणि त्यासाठी लागणारा धागा तयार केला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *