![]()
धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णायक लढा उभारण्यासाठी १ डिसेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील गावागावांतून लाखोंच्या संख्येने समाजबांधवांनी महिला, मुले आणि विद्यार्थ्यांसह सहभागी व्हावे. घराघरातून समाजाची ताकद उभी करून शासनाला आरक्षणाच्या मागणीची तीव्रता दाखवून द्यावी, असे आवाहन आरक्षण आंदोलनाचे नेते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांनी केले. राहुरी तालुक्यातील मांजरी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मांजरीचे उपसरपंच कोंडीराम विटनोर होते. समाजाच्या आरक्षणासाठी यापूर्वी विविध ठिकाणी आंदोलने झाली. मात्र, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होत असतानाच काही राजकीय पक्षांतील लोकांकडून आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप बोऱ्हाडे यांनी केला. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून संघटनशक्ती मजबूत करण्यासाठी आपण गावोगावी जाऊन समाजबांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाने भाजपला सत्तेत आणण्यासाठी मोठे योगदान दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे सरकारला दिलेल्या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी आता संघटित लढा उभारण्याची गरज आहे. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार असताना आरक्षणासाठी निर्णायक प्रयत्न करण्याची संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक समाजबांधवाने या लढ्यात सहभागी होण्याची तयारी ठेवावी, असेही ते म्हणाले. ग्रामदैवत चंद्रगिरी महाराज मंदिरात दर्शनानंतर अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ आरती करण्यात आली.
Source link
आरक्षणासाठी धनगर समाजाचा 1 डिसेंबरला नगरमध्ये महामोर्चा