Headlines

माझे नाव, फोटो-ओळख ट्रेडमार्क संरक्षित:पूर्वपरवानगीशिवाय वापरल्यास होणार कठोर कारवाई- चाकणकर, कायदा हा कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही- ठोंबरे




राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या नावाचा, फोटोचा, ओळखीचा आणि वैयक्तिक शैलीचा कोणीही विनापरवानगी व्यावसायिक वापर करू नये, यासाठी ट्रेडमार्क नोंदणी केली आहे, गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक ट्विट करत चाकणकर यांना थेट टोला लगावला आहे. जेव्हा कर्तृत्व आणि चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, तेव्हा स्वतःच्या नावाची आणि फोटोची ट्रेडमार्क नोंदणी करावी लागते, अशा शब्दांत उपरोधिक टोला लगावला आहे. अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येत असलेल्या या चित्रपटात आपली छबी वापरली जात असल्याच्या चर्चेदरम्यान चाकणकरांनी हा कायदेशीर पवित्रा घेतला आहे. यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेल्या ट्विटमुळे या वादात आणखी भर पडली असून, महिला नेत्यांमधील हा कलगीतुरा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. रुपाली चाकणकरांचे ट्विट काय? रुपाली चाकणकर म्हणाल्या की, माझे नाव,माझा फोटो,माझी ओळख,माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी,वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास,अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल. रुपाली पाटील ठोंबरे काय म्हणाल्या? यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत म्हटलंय की, रुपाली चाकणकर, आता महाराष्ट्राला धमक्या देणे बंद करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या! राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा आणि गरिमा जपण्याऐवजी त्या पदाचा वापर राजकीय स्वार्थासाठी झाल्याचे गंभीर आरोप झाले. अखेर राजीनामा द्यावा लागला. ज्या नेतृत्वाने तुम्हाला या पदावर बसवले, त्यांनीच आता या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राला उत्तर द्यावे! 1.ट्रेडमार्कचा दावा करता, मग कागदपत्रे दाखवा! कोणत्या ट्रेडमार्कची नोंदणी झाली? त्याचे अधिकृत प्रमाणपत्र काय आहे? संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमांनुसार मंजुरी दिली? पारदर्शकपणे खुलासा करा. 2.माझ्याविरोधात बोलू नका, गुन्हे दाखल करीन, कोर्टात खेचीन अशा धमक्या देऊन जनतेचा आवाज बंद करता येत नाही. कायदा हा कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि न्याय मागण्याचा अधिकार दिला आहे. 3. महिला आयोगाच्या कार्यकाळातील गंभीर प्रश्नांची उत्तरे द्या! भोंदूबाबा खरात प्रकरणातील तुमची कथित भूमिका, त्याच्या ट्रस्टवरील विश्वस्तपद आणि पत्रकार खेमणार यांच्याशी संबंधित प्रकरणात आयोगाच्या पत्रव्यवहाराबाबत महाराष्ट्राला स्पष्टीकरण द्या.
महिला आयोग हे महिलांच्या न्यायासाठीचे घटनात्मक मूल्य जपणारे व्यासपीठ आहे; कोणाच्या राजकीय प्रतिष्ठेचे किंवा वैयक्तिक दबावाचे साधन नाही.आता महाराष्ट्राला तुमचे आरोप-प्रत्यारोप, धमक्या आणि प्रसिद्धीचे राजकारण ऐकण्यात रस नाही.महाराष्ट्रासमोर बेरोजगारी, शिक्षण, महिला सुरक्षा, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जगण्याचे प्रश्न आहेत. त्यावर बोला!लक्षात ठेवा, पद मोठे नसते; त्या पदावर बसून केलेले काम मोठे असते. आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून कोणालाही पळ काढता येणार नाही! महाराष्ट्राला धमक्या नकोत, सत्य आणि पारदर्शक उत्तरे हवीत असे ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *