![]()
पापरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मोहोळ कृषी विज्ञान केंद्र, आत्मा सोलापूर आणि कृषी विभाग, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देवडी (ता. मोहोळ) येथे शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अटारी, पुणे येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमापूर्वी डॉ. अली यांनी मोहोळ कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील कृषी विस्तार उपक्रम आणि कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर त्यांनी मार्गदर्शन केले. केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. तानाजी वळकुंडे यांनी त्यांचे स्वागत करून केंद्राचा प्रगती अहवाल सादर केला. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत शेळीपालन, कुक्कुटपालन आणि तुती लागवड यांसारखे कृषिपूरक व्यवसाय स्वीकारावेत, असे आवाहन डॉ. अली यांनी केले. शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते. तूर उत्पादनासोबतच तुरीपासून डाळ तयार करून स्वतःचा ब्रँड विकसित करण्याची संधी शेतकऱ्यांनी ओळखावी. केवळ शेतीमालाचे उत्पादन घेण्यापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उद्योजक बनावे. यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या आर्थिक व व्यावसायिक संधींचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेती आणि पशुपालन व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे नियोजन, चारा व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. या चर्चासत्रास तालुका कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी गावडे, संदीप जाधव, डॉ. सूरज मिसाळ, सुयोग ठाकरे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मिनरल मिक्स्चरचा योग्य वापर करा डॉ. तानाजी वळकुंडे यांनी जनावरांच्या चारा व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना मुरघास तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले. मुरघास तयार करण्याची शास्त्रीय पद्धत, योग्य चाऱ्याची निवड, उत्पादनादरम्यान घ्यावयाची काळजी आणि टाळावयाच्या चुका यांची माहिती त्यांनी दिली. तसेच जनावरांचे आरोग्य व पोषण संतुलित राखण्यासाठी मिनरल मिक्स्चरचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. योग्य वाणांची निवड करणे आवश्यक तांत्रिक सत्रात मृदशास्त्र विषयतज्ज्ञ काजल म्हात्रे यांनी नैसर्गिक शेती, जमिनीचे आरोग्य संवर्धन आणि कमी खर्चातील शेती पद्धती यांची माहिती दिली. जमिनीतील ओलावा टिकविणे, मृदसंधारण करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे तसेच कमी कालावधीत येणाऱ्या योग्य वाणांची निवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
शेतीपूरक व्यवसायांतून आर्थिक उन्नती शक्य- डॉ.शाकीर अली:देवडी येथे शेतकरी चर्चासत्राचे आयोजन