![]()
देशभरातील राज्य पोलिस दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या सहभागातून नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘विस्फोटक कवच-10’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) तृतीय क्रमांक पटकावला आहे. 9 ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत देशातील विविध सुरक्षा दलांशी स्पर्धा करत सीआरपीएफने आपले तांत्रिक कौशल्य, व्यावसायिक क्षमता आणि कार्यतत्परता सिद्ध केली. राष्ट्रीय स्तरावरील या सरावामध्ये सुरक्षा दलांच्या स्फोटकविरोधी कारवायांची सज्जता आणि तांत्रिक कौशल्याची कसून तपासणी करण्यात आली. यासाठी एकूण 11 प्रकारच्या आव्हानात्मक श्रेणी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये स्फोटक उपकरणांचा (आयईडी) शोध घेणे, त्यांना निष्क्रिय करणे, स्फोटकांची ओळख पटविणे, स्फोटानंतर घटनास्थळाचा तपास (पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशन), आयईडी तयार करण्याच्या पद्धतींचे तांत्रिक आकलन तसेच श्वानपथकाच्या मदतीने स्फोटकांचा शोध घेणे अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होता. सीआरपीएफच्या पथकाला पुण्यातील आयआयएम, सीआरपीएफ यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक कमांडंट स्वप्नील पवार यांनी पथकाचे नेतृत्व केले. विविध तांत्रिक आणि व्यावहारिक कसोट्यांवर प्रभावी कामगिरी करत पथकाने देशात तृतीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत प्रथमच सीआरपीएफने विशेष दलांच्या (स्पेशल फोर्सेस) पंक्तीत स्थान मिळवत पदकविजेती कामगिरी नोंदवली आहे. सीआरपीएफच्या जवानांचे व्यावसायिक कौशल्य, कठोर प्रशिक्षण, समर्पण आणि प्रत्यक्ष कारवाईसाठीची सज्जता या यशातून अधोरेखित झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण पथकाचे सुरक्षा दलाच्या वर्तुळातून कौतुक होत आहे.
Source link
‘विस्फोटक कवच-10’ स्पर्धेत सीआरपीएफला देशात तृतीय क्रमांक:सर्व राज्य पोलिस दल-केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांशी स्पर्धा; पुण्यातील आयआयएमच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी