![]()
व्यवसायासाठी 50 लाख रुपये घेतल्यानंतर परत न करता फसवणूक केल्या प्रकरणी मार्केट यार्ड भागातील व्यापाऱ्यासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंद्रकांत केशरचंद बाठिया, रुपेश चंद्रकांत बाठिया (दोघे रा. वर्धमानपुरा सोसायटी, गंगाधाम रस्ता, मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 48 वर्षीय महिला गुलटेकडीतील सॅलिसबरी पार्क परिसरात राहायला आहेत. आरोपींशी त्यांचा परिचय होता. व्यवसायासाठी पैशांची गरज आहे, असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी 50 लाख रुपये घेतले. आरोपींनी त्यांना पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सुनीता नवले तपास करत आहेत. शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 15 लाखांची फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेसह दोघांची 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी वारजे आणि मुंढवा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वारजे भागातील एका महिलेची चार लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक धेंडे तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने मुंढवा भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची नऊ लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मुंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
Source link
व्यावसायासाठी घेतले 50 लाख अन् परत करण्यास टाळाटाळ:पुण्याच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यासह मुलावर गुन्हा दाखल