![]()
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाचा एक संतापजनक कारभार भंडाऱ्यातील रोहा गावात समोर आला आहे. भंडारा ते मुंढरी असा प्रवास करणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनींना एसटी बसचे चालक आणि वाहकाने रात्रीच्या अंधारात अर्ध्या वाटेतच उतरवले. बसमध्ये इतर प्रवासी नसल्याचे कारण देत या मुलींना रोहा गावात सोडून देण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भंडारा येथून मुंढरीकडे जाणारी एसटी बस (एमएच 40 वाय 5008) रात्रीच्या वेळी रोहा गावात पोहोचली. त्यावेळी बसमध्ये केवळ या दोन विद्यार्थिनीच प्रवासी म्हणून शिल्लक होत्या. त्यांना पुढे मुंढरीला जायचे होते. मात्र, बसमध्ये इतर कोणीही प्रवासी नसल्याचे कारण पुढे करत, चालक आणि वाहकाने या दोन मुलींना रात्रीच्या मिट्ट अंधारात रोहा गावातच खाली उतरवले आणि बस पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. दौरा रद्द करत सभापती पोहोचले गावात या धक्कादायक घटनेची माहिती गावात आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली. रात्रीच्या वेळी दोन मुलींना अशा प्रकारे निर्जन ठिकाणी सोडल्याचे समजताच, जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांनी आपला नियोजित दौरा तात्काळ रद्द केला. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी थेट रोहा गाव गाठले आणि परिस्थितीची पाहणी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या कृतीवर संतप्त सवाल एसटी प्रशासनावर विश्वास ठेवून मुली प्रवास करत असताना, त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या गावापर्यंत न पोहोचवल्याने पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. केवळ बसमध्ये इतर प्रवासी नव्हते, हे कारण देऊन रात्रीच्या अंधारात दोन मुलींना वाऱ्यावर सोडून देण्याचा निर्णय चालक-वाहकाने कसा घेतला? त्यांच्या सुरक्षिततेचा साधा विचारही या कर्मचाऱ्यांच्या मनात का आला नाही? असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत.
Source link
भंडाऱ्यात एसटीचा संतापजनक कारभार:दोन शाळकरी विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात अर्ध्या वाटेतच उतरवले; प्रवासी नसल्याचे कारण देत मनमानी!