![]()
देशात नवीन उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांसाठी आता बँकिंग व्यवहार अधिक वेगवान आणि सोपे होणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) ‘स्पीस प्लस’ (SPICe+) या अधिकृत पोर्टलवर फेडरल बँकेला आता स्थान मिळाले आहे. बँकेने आज या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. या समावेशामुळे नवीन कंपनीची नोंदणी करतानाच उद्योजकांना फेडरल बँकेत झटपट आणि कमीत कमी कागदपत्रांसह बँक खाते उघडता येणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेले ‘स्पीस प्लस’ हे एक एकत्रित डिजिटल व्यासपीठ आहे. कंपनी स्थापनेपासून ते विविध कायदेशीर नोंदणी पूर्ण करण्यापर्यंतची सर्व कामे या एकाच पोर्टलवर पार पाडली जातात. यामध्ये बँक खाते उघडण्याचाही समावेश असतो. आता या यादीत फेडरल बँकेचा समावेश झाल्यामुळे नवीन कंपन्या, स्टार्टअप्स आणि उदयोन्मुख उद्योगांना नोंदणीच्या वेळीच फेडरल बँकेची निवड करता येईल. यामुळे कंपनी स्थापनेपासून प्रत्यक्ष बँकिंग सेवा सुरू होईपर्यंतचा टप्पा विनाअडथळा पार पडणार आहे. या नवीन सुविधेबद्दल बोलताना फेडरल बँकेचे रिटेल लायबिलिटी अँड फी प्रॉडक्ट्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि कंट्री हेड जॉय पी. व्ही. यांनी सांगितले की, उद्योजकांनी कंपनी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांना विश्वासार्ह बँकिंग सेवांची साथ मिळावी आणि त्यांचा व्यावसायिक प्रवास सुकर व्हावा, हाच यामागील मुख्य हेतू आहे. स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन फेडरल बँक आपली डिजिटल यंत्रणा आणि ग्राहककेंद्रित सेवा सातत्याने अद्ययावत करत आहे. आधुनिक उत्पादने, सहज उपलब्ध होणाऱ्या ऑनलाईन सेवा आणि भक्कम डिजिटल पायाभूत सुविधांच्या जोरावर देशभरातील उद्योजकतेला बळ देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसाय वाढीला गती देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. संबंधित वृत्त फेडरल बँक ‘सुपरहीट’!:दुसऱ्या तिमाहीत ₹1,386 कोटींचा सर्वाधिक निव्वळ नफा; एनपीए गेल्या दशकातील नीचांकी पातळीवर
Source link
नवीन उद्योजकांसाठी खुशखबर:फेडरल बँकेचा एमसीएच्या 'स्पीस प्लस' पोर्टलवर समावेश; कंपन्यांसाठी बँक खाते उघडण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ