![]()
दरवर्षी मिरचीमधून सुमारे ३ लाख रुपयांचे उत्पन्न काढतो, यावर्षी चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा होती मात्र पाणी नाही तर आता शेतकऱ्यांनी काय करावे, शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे अशी आर्त हाक देत पिंपळखुटा (ता. हिंगोली) येथील शेतकरी संतोष पाखरे यांनी त्यांच्या शेतातील एक एकर क्षेत्रावरील मिरचीचे पिक उपटून फेकून दिले. पिंपळखुटा येथील शेतकरी पाखरे यांना अडीच एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते दरवर्षी एक एकर क्षेत्रावर मिरचीचे उत्पादन घेतात. यावर्षीही त्यांनी एक एकर क्षेत्रावर मिरचीच्या रोपांची लागवड केली. एक एकर क्षेत्रावर त्यांनी ८ ते ९ हजार रोपे लावली. शेतातील विहीरीवरून रोपांना पाणी देऊन त्यांचे संगोपन केले. या शिवाय वेळोवेळी खताच्या मात्रा देऊन फवारण्या देखील केल्या. त्यासाठी आता पर्यंत एक लाख रुपयांचा खर्च झाला. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे विहीरीचे पाणी आटले तर विंधन विहीरीला देखील पाणी नसल्यामुळे मिरचीचे पिक वाळून जाऊन लागले. आता काढणीच्या अवस्थेतच पिक वाळून जात असल्याने या पिकातून उत्पादन येण्याची शक्यता मावळली होती. झाडांना केवळ एक ते दोन मिरच्याच लागल्या होत्या. त्यामुळे मिरची लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने पाखरे यांनी सोमवारी ता. १६ शेतात जाऊन मिरचीचे पिक उपटून टाकले. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामाचे पिक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही, रब्बी हंगामाची पेरणीही झाली नाही. आता शेतकऱ्यांनी काय करावे अन काय खावे असा सवाल करीत शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तळहाताच्या फोडासारखे जपले मात्र पिक वाळतांना पहावले नाही- संतोष पाखरे (शेतकरी) संतोष पाखरे म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मिरचीचे उत्पादन चांगले येईल या आशेवर जिल्हयातील शेतकऱ्यांकडून मिरचीचे रोप खरेदी करून लागवड केली. मात्र पावसाने दगा दिला अन विहीरीचे पाणीही आटले. सुरवातीला ठिबक सिंचनपध्दतीने पाणी दिले. मात्र आता विहीरीतच पाणी नाही तर पिकाला कुठून पाणी मिळणार, मिरचीचे वाळत चाललेले पिक पहावत नसल्याने अखेर पिक उपटून टाकले.
Source link
पाणीच नाही तर काय करावे?:हताश शेतकऱ्याने स्वतःच्या हाताने उपटून फेकले एक एकरातील मिरचीचे पीक