Headlines

मुंबई लोकलमध्ये थरार!:दोघांच्या वादात फेकलेले हत्यार थेट निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसले; प्रवाशांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर




मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंधेरी रेल्वे स्थानकावर एका चालत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाचा मोठा फटका एका निष्पाप प्रवाशाला बसला. या दोन जणांच्या वादात एकाने रागाच्या भरात भिरकावलेले धारदार हत्यार थेट एका प्रवाशाच्या छातीत घुसले. या धक्कादायक घटनेमुळे ट्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली असून अंधेरी रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश द्वारका शर्मा (वय 52) असे या जखमी प्रवाशाचे नाव आहे. ते मूळचे झारखंडमधील हजारीबाग येथील असून गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या सायन-धारावी परिसरात कुटुंबासह राहतात आणि सुतारकाम करून उदरनिर्वाह करतात. 15 नोव्हेंबर 2026 रोजी सुरेश हे बोरीवली पूर्व येथे एका ग्राहकाला भेटण्यासाठी गेले होते. तिथून दुपारी 12:58 च्या सुमारास ते चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अप फास्ट लोकलमध्ये चढले आणि पहिल्या जनरल डब्यात दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करत होते. प्रवाशांमधील वाद ट्रेन बोरीवलीवरून पुढे निघाल्यावर सुरेश यांच्या मागे बसलेल्या दोन अनोळखी प्रवाशांमध्ये कोणत्यातरी कारणावरून अचानक बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघेही एकमेकांना अश्लील शिवीगाळ करू लागले. अंधेरी स्थानक जवळ येईपर्यंत त्यांचा हा वाद अधिकच वाढला आणि भांडत असताना दोघेही डब्याच्या दरवाज्याजवळ येऊन उभे राहिले. अंधेरी स्थानकावर थरार दुपारी 12:12 च्या सुमारास लोकल अंधेरी स्थानकावर थांबली, तेव्हा त्यातील एक तरुण फलाटावर उतरला. मात्र, त्याचा राग शांत झाला नव्हता. ट्रेन अंधेरीवरून पुढे निघू लागताच फलाटावर उभ्या असलेल्या या तरुणाने रागाच्या भरात डब्यात असलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या दिशेने एक घातक हत्यार भिरकावले. हे हत्यार त्या प्रवाशाला न लागता, तिथेच दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीत उजव्या बाजूला घुसले. या अचानक झालेल्या हल्ल्याने सुरेश रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. प्रवाशांची तत्परता आणि उपचार या भीषण घटनेनंतर डब्यातील इतर सहप्रवाशांनी तातडीने प्रसंगावधान राखत चैन पुलिंग करून ट्रेन थांबवली आणि जखमी सुरेश यांना आधार दिला. ट्रेन बांद्रा रेल्वे स्थानकावर पोहोचताच तेथील आरपीएफ आणि एमएसएफ जवानांनी सुरेश यांना स्टेशनवरील कार्यालयात नेऊन तातडीने प्रथमोपचार दिले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी बांद्रा येथील भाभा रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांकडून आरोपीला अटक या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून हत्यार भिरकावणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या. शिवाजी लक्ष्मण गायकवाड (वय 25, रा. निफाड, नाशिक) असे या आरोपीचे नाव असून तो विनातिकीट प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना अंधेरी स्थानक परिसरात घडल्याने पुढील कारवाईसाठी गुन्हा अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सुरेश यांच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीवर हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *