![]()
नेहमीपेक्षा अधिक श्वास लागणे, खोकला वाढणे किंवा कफाचे प्रमाण आणि रंग बदलणे ही केवळ किरकोळ लक्षणे नसून क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) या फुफ्फुसांच्या आजाराचा तीव्र झटका (एक्झॅसर्बेशन) येण्याची पूर्वसूचना असू शकते. त्यामुळे श्वासाचा त्रास असह्य होईपर्यंत वाट न पाहता सुरुवातीची लक्षणे ओळखून तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, असे आवाहन सल्लागार फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. हर्षा जैन यांनी केले आहे. सीओपीडी हा दीर्घकालीन फुफ्फुसांचा आजार असून, यामध्ये श्वास घेणे आणि सोडणे कठीण होते. उपचारांमुळे लक्षणे नियंत्रणात असली, तरी काही वेळा अचानक श्वास लागणे, खोकला आणि कफ वाढण्याचा त्रास होतो. या स्थितीला सीओपीडी चा तीव्र झटका म्हणतात. यामुळे रुग्णाला अतिरिक्त उपचारांची किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. या झटक्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित होतात. चालताना वारंवार थांबावे लागणे, रात्री श्वास लागल्याने जाग येणे, नेहमीपेक्षा अधिक खोकला येणे किंवा कफाच्या रंगात बदल होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. श्वसनमार्गातील संसर्ग आणि वायुप्रदूषण यामुळे हा त्रास वाढू शकतो. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वैयक्तिक उपचार कृती आराखडा तयार ठेवावा. स्वतःहून अँटिबायोटिक्स किंवा स्टेरॉइड्स घेऊ नयेत. विश्रांतीतही तीव्र श्वास लागणे, ओठ निळे पडणे, छातीत दुखणे किंवा बोलण्यास त्रास होणे ही धोक्याची लक्षणे असून तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. नियमित तपासणी, इनहेलरचा योग्य वापर, आवश्यक लसीकरण, शारीरिक हालचाली आणि तंबाखूचा धूर व प्रदूषणापासून दूर राहणे यामुळे आजाराचे व्यवस्थापन करता येते. जागतिक सीओपीडी दिनानिमित्त रुग्णांनी नेहमीच्या श्वासोच्छ्वासातील बदल गांभीर्याने घ्यावेत, असे डॉ. जैन यांनी सांगितले.
Source link
श्वास लागणे वाढणे सीओपीडीच्या झटक्याचा इशारा:जागतिक सीओपीडी दिनानिमित्त डॉ. हर्षा जैन यांचे आवाहन; सुरुवातीची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या