![]()
अमरावती जिल्ह्यातील पेसा (मेळघाट) क्षेत्रात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या टेट-२५ अंतर्गत ४७ पात्र उमेदवारांनी शाळांवर पदस्थापना स्वीकारली. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या (प्राथमिक) वतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे, उपशिक्षणाधिकारी सतीश मुगल आणि अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी उमेदवारांशी संवाद साधला. उमेदवारांना गुणवत्ता आणि उपलब्ध रिक्त पदांनुसार शाळा निवडण्याची संधी देण्यात आली. मराठी माध्यमाच्या इयत्ता १ ते ५ साठी पात्र ५२ उमेदवारांपैकी ४१ जणांनी पदस्थापना स्वीकारली. चार उमेदवार गैरहजर राहिले, तर सात जणांनी पदस्थापना नाकारली. उर्दू माध्यमाच्या इयत्ता १ ते ५ साठीच्या चारही उमेदवारांनी पदस्थापना स्वीकारली. इयत्ता ६ ते ८ मधील उर्दू माध्यमाच्या भाषा विषयासाठी एकमेव उमेदवारानेही पदस्थापना स्वीकारली. माध्यमिक विभागातील इयत्ता ६ ते ८ च्या एका उमेदवारानेही शाळेवर रुजू होण्यास संमती दिली. या चार संवर्गांतील एकूण ४७ उमेदवारांनी पदस्थापना स्वीकारली. या प्रक्रियेमुळे पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. प्रक्रियेसाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, पंकज गुल्हाने, विजय कविटकर, वरिष्ठ सहाय्यक विलास मेंदुकर, विजय राऊत, सुदर्शन भोसले, विजय मालोकार आणि कनिष्ठ सहाय्यक तपासे व अनिकेत हुरडे यांनी काम पाहिले.
Source link
मेळघाटातील 47 शिक्षकांनी पदस्थापना स्वीकारली:पवित्र पोर्टल भरतीच्या पहिल्या टप्प्यात पेसा क्षेत्रातील शाळांसाठी समुपदेशन