Headlines

गोकुळमधील सत्तासंघर्ष गाजवणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसची मोठी जबाबदारी:गोवा विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रीनिंग कमिटीत नियुक्ती




कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांना घेरणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यावर पक्षाने आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने स्थापन केलेल्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये सतेज पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय असलेल्या बंटी पाटलांना गोव्यातील निवडणूक तयारीतही महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. विशेष म्हणजे, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका आणि संघटनात्मक कामाची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतल्याचे या नियुक्तीवरून स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी 16 नोव्हेंबर रोजी या नियुक्तीबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी के. जे. जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातील आमदार सतेज पाटील आणि खासदार शफी परंबिल यांना या समितीत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे गोव्यातील काँग्रेसच्या आगामी निवडणूक रणनीतीमध्ये सतेज पाटील यांचा सहभाग असणार आहे. गोकुळमधील सत्तासंघर्षामुळे बंटी पाटील चर्चेत काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 25 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवले होते. मात्र, चेअरमन निवडीच्या वेळी आवश्यक असलेला 14 सदस्यांचा कोरम पूर्ण होत नसल्याचा मुद्दा पुढे आला. त्यानंतर सत्ताधारी महायुतीकडून चार शासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रक्रियेमुळे सत्ताधारी गटाच्या उमेदवाराला चेअरमनपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या घडामोडींनंतर सतेज पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला होता. निवडणुकीत बहुमत मिळवूनही सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. गोकुळच्या सत्तासंघर्षामुळे कोल्हापूरच्या राजकारणासह राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा झाली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणावर भाष्य करत भाजपवर लोकशाही संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे गोकुळचा विषय राष्ट्रीय राजकारणातही चर्चेचा ठरला. गोव्यात उमेदवार निवडीची जबाबदारी आता काँग्रेसने सतेज पाटील यांच्यावर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. स्क्रीनिंग कमिटी ही निवडणुकीपूर्वी उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची समिती असते. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, संभाव्य उमेदवारांची लोकप्रियता, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क, पक्षातील संघटनात्मक ताकद आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता अशा विविध बाबींचा विचार करून ही समिती उमेदवारांची छाननी करणार आहे. गोव्यात काँग्रेससमोर भाजपचे आव्हान असणार आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे समजून घेणे, पक्षातील इच्छुक उमेदवारांची क्षमता तपासणे आणि निवडणुकीसाठी योग्य चेहऱ्यांची निवड करणे या दृष्टीने स्क्रीनिंग कमिटीचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांतील राजकीय परिस्थितीची जाण असलेल्या सतेज पाटील यांना या प्रक्रियेत सहभागी करून काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. या नियुक्तीनंतर सतेज पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी समन्वय साधून जनतेशी जोडलेले आणि सक्षम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 2027 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका दरम्यान, 2027 मध्ये देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. यापैकी उत्तर प्रदेशची निवडणूक राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तर, महाराष्ट्राचे शेजारील राज्य असलेल्या गोव्यातील सत्तासंघर्षाकडेही राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. उमेदवारांची निवड, स्थानिक नेतृत्वाशी समन्वय आणि निवडणूक रणनीती निश्चित करण्यासाठी पक्षाकडून विविध समित्यांची स्थापना केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून गोवा विधानसभा निवडणुकीच्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये सतेज पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोल्हापूरच्या राजकारणात आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी सतेज पाटील प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे आता गोव्याच्या निवडणूक प्रक्रियेतही त्यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे आगामी काळात गोव्यात काँग्रेसची उमेदवार निवड आणि निवडणूक रणनीती ठरवताना बंटी पाटील यांची भूमिका कशी राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. मुंबई लोकलमध्ये थरार!:दोघांच्या वादात फेकलेले हत्यार थेट निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसले; प्रवाशांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंधेरी रेल्वे स्थानकावर एका चालत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाचा मोठा फटका एका निष्पाप प्रवाशाला बसला. या दोन जणांच्या वादात एकाने रागाच्या भरात भिरकावलेले धारदार हत्यार थेट एका प्रवाशाच्या छातीत घुसले. या धक्कादायक घटनेमुळे ट्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली असून अंधेरी रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *