![]()
उत्पादनाच्या पाकिटावरील बारकोड स्कॅन केल्यावर किंमत, उत्पादनाचा तपशील किंवा इतर माहिती दिसते. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी विशिष्ट प्रकाशातच वाचता येईल असे सुरक्षित बारकोडचे तंत्र विकसित केले आहे. या बारकोडमधील माहिती वाचण्यासाठी ठरावीक तरंगलांबीचा प्रकाश लागेल. स्कॅन करण्याची पद्धत माहीत नसलेल्या व्यक्तीला त्यातील गोपनीय माहिती वाचता येणार नाही. सध्या वापरल्या जाणाऱ्या बारकोडमध्ये काळ्या रेषा आणि पांढऱ्या जागांच्या रचनेत माहिती साठवलेली असते. स्कॅनर ही रचना वाचून माहिती संगणक किंवा मोबाइलवर दाखवतो. नव्या तंत्रात बारकोड तयार करण्यासाठी ल्युमिनिसेंस मटेरियल वापरले आहे. या पदार्थावर विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश टाकल्यास तो ठरावीक रंगाचा प्रकाश सोडतो. वेगवेगळ्या तरंगलांबींवर वेगवेगळे रंग दिसू शकतात. या गुणधर्मामुळे बारकोडमधील माहिती वाचण्याची प्रक्रिया नियंत्रित करता येते. उदाहरणार्थ, उत्पादनाची सामान्य माहिती एका तरंगलांबीवर, तर संवेदनशील माहिती दुसऱ्या तरंगलांबीवर दिसेल, अशी रचना करता येऊ शकते. संबंधित माहिती वाचण्यासाठी कोणत्या तरंगलांबीचा प्रकाश वापरायचा, हे माहीत असणे आवश्यक असेल. त्यामुळे बारकोडचा फोटो किंवा प्रतिमा मिळाली, तरी त्यातील सर्व माहिती वाचता येणार नाही. योग्य प्रकाशस्रोत आणि स्कॅनिंग व्यवस्था असलेल्यालाच संबंधित माहिती पाहता येईल. यामुळे बारकोडला अतिरिक्त सुरक्षा स्तर मिळू शकतो. भारतीय सेना, बँकिंग, ऑनलाइन व्यापार, उत्पादनांची गुणवत्ता तपासणी आणि संवेदनशील कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी या तंत्राचा उपयोग होऊ शकतो. उत्पादन अस्सल आहे की बनावट, त्याची गुणवत्ता आणि पुरवठा साखळीतील तपशील विशिष्ट प्रकाशात तपासता येतील. यामुळे बनावट उत्पादनांना आळा घालण्यास मदत होण्याची शक्यता आहे. या संशोधनात भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय जानराव ढोबळे, संशोधक विद्यार्थी प्रफुल्ल खोंडे, एमएस्सीची विद्यार्थिनी वैष्णवी थोटे आणि प्रा. डॉ. एन. आर. पवार यांचा समावेश आहे. या तंत्राच्या डिझाइनसाठी संशोधकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.
Source link
विशिष्ट प्रकाशातच वाचता येणार बारकोडमधील माहिती:नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी ल्युमिनिसेंस मटेरियल वापरून तंत्र विकसित केले; सेना, बँकिंग आणि ऑनलाइन व्यापारात उपयोगाची शक्यता