Headlines

पक्षाला का वेठीस धरता?:रोहित पवारांनी स्वतःच ती वैयक्तिक पत्रकार परिषद असल्याचे सांगितले; सुप्रिया सुळेंची स्पष्टोक्ती; आव्हाडांवरही खुलासा




दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. “रोहित पवार यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत सांगितले की ही पक्षाची पत्रकार परिषद नसून त्यांचे वैयक्तिक मत आहे. सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो; मग त्यांनी स्वतःच स्पष्ट केले असताना तुम्ही पक्षाला का वेठीस धरता?” असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना विचारला. यासोबतच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, 5000 रुपयांची रखडलेली मदत, एसआरए घोटाळा, डीलिमिटेशन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. मी पॉलिसी मेकर आहे, विमान वाहतूक तज्ञ नाही; अहवालाची वाट पाहूया रोहित पवार पक्षाच्या आत एकटे पडले आहेत का आणि फडणवीसांवरील आरोपांशी आपण सहमत आहात का, या प्रश्नांना उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. मी एक लोकप्रतिनिधी आणि पॉलिसी मेकर आहे, पण नागरी उड्डाण क्षेत्रातील तांत्रिक तज्ज्ञ नाही. त्यामुळे तांत्रिक बाबींवर भाष्य करण्यासाठी मी सक्षम अधिकारी नाही; याबाबत तज्ज्ञांशी चर्चा झाली तर जनतेला अधिक स्पष्ट उत्तरे मिळतील. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर अहवालाची प्रतीक्षा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या गृहमंत्र्यांकडे या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आता आपण त्या अधिकृत तपास अहवालाची वाट पाहूया, असे सुळे म्हणाल्या. मनमोहन सिंग आणि पवारांनी 70000 कोटींची कर्जमाफी दिली, तुम्हीही द्या राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि रखडलेल्या मदतीवरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नांदेड जिल्ह्यात कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून एका शेतकऱ्याने जीवन संपवल्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “शेतकरी आत्महत्या आमच्या काळात झाल्या असतील किंवा यांच्या काळात, एकही आत्महत्या होणे दुर्दैवीच आहे. दुष्काळात वसुलीसाठी कोणीही शेतकऱ्याच्या दारात जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते; मग तरीही वसुली का सुरू आहे? डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान आणि शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे 70000 कोटी रुपये कर्ज माफ केले होते; महाराष्ट्र सरकारनेही त्याच धर्तीवर सरसकट कर्जमाफी करावी,” अशी मागणी त्यांनी केली. 5000 रुपयांच्या मदतीसाठी दररोज यादी देणार सरकारने जाहीर केलेली 5000 रुपयांची मदत अद्याप बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा, मुळशी आणि खडकवासला तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. काल पुणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत वंचित शेतकऱ्यांची नावे दिल्यास तत्काळ निधी सोडण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे आजपासून आमचे कार्यकर्ते तलाठी व तहसीलदारांकडून वंचित शेतकऱ्यांची यादी तयार करून दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करतील, असे त्यांनी सांगितले. उसाला 4200 रुपये दर आणि 400 कोटींच्या निधीचे स्वागत कोल्हापूरमध्ये उसाला 4200 रुपये दर दिला गेला, मग छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि धाराशिवमधील शेतकऱ्यांना तोच दर का मिळत नाही? सरकारने राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. दरम्यान, दुष्काळी जिल्ह्यांतील जलसंधारणासाठी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या 400 कोटी रुपयांच्या निधीचे स्वागत करत, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. एसआरए घोटाळ्याबाबत आयुक्त अश्विनी भिडेंच्या पत्रांना केराची टोपली खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) 33(11) योजनेतील सुमारे 20000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे सुप्रिया सुळे यांनी समर्थन केले. राऊत हे देशातील ज्येष्ठ आणि जबाबदार संसदपटू आहेत, त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तर दिलेच पाहिजे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही एसआरएला पत्र लिहिले होते, मात्र त्यांच्या पत्रांनाही केराची टोपली दाखवली जात आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सुळे म्हणाल्या. जितेंद्र आव्हाड आमचे वरिष्ठ नेते; डीलिमिटेशनबाबत भूमिका कायम मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डीलिमिटेशन) मुद्द्यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची जी भूमिका एप्रिलमध्ये होती, तीच नोव्हेंबरमध्येही आहे. या प्रकरणी पक्षाचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचे मत अत्यंत महत्त्वाचे असून, पक्षाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे; कालही त्यांचे मत घेतले गेले, आजही घेतले जाते आणि उद्याही घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे 5 ते 7 दशकांचे ऋणानुबंध बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली नाही, या भाजपच्या टीकेवर बोलताना हा काँग्रेस आणि शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचे सुळे म्हणाल्या. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना त्या भावूक झाल्या. “पवार आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध आजचे नसून 5 ते 7 दशकांचे आहेत. राजकारणात बाळासाहेब आणि पवार साहेबांनी एकमेकांना टोकाचा विरोध केला, पण वैयक्तिक नात्यात कधीही कटुता येऊ दिली नाही. माझे सासरे भालचंद्र सुळे आणि बाळासाहेब यांचेही अत्यंत प्रेमाचे नाते होते; त्यामुळे माहेर आणि सासर दोन्हीकडून आमचे ठाकरे कुटुंबाशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत,” असे त्यांनी सांगितले. यासोबतच रायगडमध्ये वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत भयानक असून, प्रशासनाच्या दिरंगाईवर सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. ————————————————————– हेही वाचा… पुढला बॉम्ब टाकेन तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल: 300 एसआरए प्रकल्पांच्या घोटाळ्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील 2 ते 3 बिल्डरांसाठी नियमात न बसणारे तब्बल 300 प्रकल्प एसआरएमध्ये घुसवले जात असून, यातून राज्याचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. मी जेव्हा या प्रकरणाचा पुढला बॉम्ब टाकेन, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल,” असा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे. बुधवारी (18 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे पत्र, रुपयाची घसरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परदेश दौरा आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *