![]()
खडकवासला धरणसाखळीत सध्या सुमारे साडेएकवीस टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. जानेवारीपासून दिवसाआड, फेब्रुवारीत आठवड्यातून तीन दिवस आणि एप्रिल-मे महिन्यांत दहा दिवसांतून एकदा पाणी मिळण्याची शक्यता आहे, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष (पूर्व) आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. जगताप म्हणाले की, खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. बाष्पीभवनाचे प्रमाणही अधिक आहे. असे असतानाही सात जुलैपासून कालव्यातून पाणी सोडले जात आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून हा विसर्ग सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यायला हवे. कालवा समितीच्या बैठकीत पुण्याचे खासदार आणि आमदार यांनी कालव्यातून पाणी सोडण्यास विरोध केला नाही, असा आरोप जगताप यांनी केला. पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी गप्प आहेत. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पुण्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेची जाणीव झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले जात असल्याचा आरोपही जगताप यांनी केला. दुष्काळामुळे राज्यातील दहा ते बारा लाख लोक पुण्यात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यासाठी पुरेसा राखीव पाणीसाठा असणे गरजेचे आहे. खडकवासला धरणातून खरीप शेतीसाठीही पाणी सोडण्यात आले आहे. सध्याच पाण्याचा वापर वाढल्यास दौंड, बारामती आणि हवेली तालुक्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे जगताप म्हणाले. दुष्काळात धरणांमधील पाणी पिण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवायला हवे. मी शेतीच्या विरोधात नाही; मात्र शहराची वाढती लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. पाणीगळती रोखण्यात महापालिका, जलसंपदा विभाग अपयशी पुण्यातील पाणीगळती रोखण्याची जबाबदारी महापालिका आणि जलसंपदा विभागाची आहे. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस उपाय होत नाहीत, असे जगताप म्हणाले. पुण्यात नवीन धरण बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. टाटा धरणातून पाणी आणण्याचे आश्वासन दिशाभूल करणारे मुळशी धरण टाटा समूहाच्या ताब्यात आहे. या धरणातून पुण्याला पाच टीएमसी पाणी मिळवण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. धरणातून पाणी आणण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकावी लागेल. खासदार मुरलीधर मोहोळ पुण्याला टाटा धरणातून पाणी देण्याबाबत सांगत असतील, तर ते पुणेकरांची दिशाभूल करणारे आहे, अशी टीका जगताप यांनी केली.
Source link
पुण्यात जानेवारीपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याची शक्यता:एप्रिल-मे महिन्यांत दहा दिवसांतून एकदा पाणी मिळू शकते; धरणातील पाण्याचे नियोजन नसल्याचा प्रशांत जगताप यांचा आरोप