Headlines

एकरी 1500 ऐवजी हाती 100 किलो भात:पावसाअभावी इंद्रायणी, झिनी सुगंधी भात वाणांच्या लोंब्या दाण्यांऐवजी पोकळ तुसानेच भरल्या




पावसाची वार्षिक सरासरी ३,०५८ मिमी असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी केवळ १,२६७ मिमी (४२%) पाऊस झाल्याने विदारक स्थिती ओढवली आहे. कसदार खाचरांमध्ये एरवी एकरी सरासरी १,५०० किलो (१५ क्विंटल) भात उत्पादन होते. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पीक वाळून गेले आहे. आज प्रत्यक्ष शिवारात स्थिती अशी आहे की, शेतकऱ्यांच्या हाती एकरी जेमतेम १०० किलो धान्य पडत आहे. दरवर्षी बियाणे, मशागत, रोपे आणि लावणीवर एकरी ३० हजार रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण भांडवल मातीमोल झाले असून, एकरी थेट २५ ते ३० हजार रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे. इगतपुरी तालुका हा भाताचे कोठार मानला जातो. मात्र, येथील बहुतांश शेती ही सह्याद्रीच्या डोंगरउतारावर व कसदार खाचरांमध्ये केली जाते. खडकाळ आणि उताराची जमीन असल्याने पावसाचा खंड पडताच जमिनीतील ओलावा २ ते ३ दिवसांत नष्ट होतो. यंदा पावसाने सुरुवातीला २० ते २५ दिवस ओढ दिल्याने लावणी लांबली, तर सप्टेंबरमध्ये ऐन पोटरी आणि लोंबी भरण्याच्या अवस्थेत तब्बल ५८ टक्के पावसाची तूट राहिली. परिणामी, इंद्रायणी, झिनी, दफ्तरी अशा प्रसिद्ध सुगंधी वाणांच्या लोंब्या दाण्यांऐवजी केवळ पोकळ तुसानेच भरल्या आहेत. पावसाची तूट ५८ टक्के संभाव्य उत्पादन घट – ८० ते ९० टक्के यंदा अपेक्षित उत्पादन – १०० किलोपेक्षा कमी एकरी सरासरी उत्पादन – १,५०० किलो यंदा झालेला पाऊस – १,२६७ मिमी (४२%) एका एकराचा सरासरी उत्पादन खर्च – ३०,००० रुपये शेतात उभी असलेली ताटे जळून पिवळी पडली असून, ती जनावरांच्या खाण्यायोग्यही उरलेली नाहीत. भात उत्पादक शेतकरी आधीच नुकसानीच्या संकटात असताना मजुरीचे दर भरमसाठ वाढल्याने शेतीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भात शेती परवडेनाशी झाली असून, यंदा भातशेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अन्नधान्यांचा प्रश्न गंभीर : तालुक्यातील बहुतांश आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी हे व्यापारी शेती करत नसून, वर्षभराच्या खावटीसाठी भात पिकवतात. उत्पादनच ९० टक्के घटल्याने कुटुंबाच्या अन्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे. रोजगाराअभावी स्थलांतर : भातकापणी, मळणी या स्थानिक कामांमधून मजुरांना रोजगार मिळायचा. पीकच करपल्याने शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. परिणामी, दिवाळीनंतर इगतपुरीच्या वाड्या-वस्त्यांवरून मुंबई, ठाणे आणि नाशिककडे वीटभट्ट्या आणि बांधकामांवर हंगामी स्थलांतर सुरू होण्याची भीती आहे. ^खाचरांमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते. पाऊस थांबला की जमीन लगेच भेगाळते. पाच एकरांत एरवी ७५ क्विंटल भात पिकायचा; यंदा पाच एकर मिळून ५०० किलोही भात होणार नाही. एकरी ३० हजारांप्रमाणे दीड लाख रुपये पाण्यात गेले आहेत. वर्षभर कुटुंबाला खायला काय घालायचे, हा प्रश्न आहे. – एकनाथ बोडके, शेतकरी, मोडाळे डोंगरउतारावरील शेतीत मशागत आणि लावणीसाठी एकरी तब्बल ३० हजार रुपयांचा उत्पादन खर्च झाला आहे. मात्र, उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाल्याने आदिवासी व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे भांडवलही बुडाले आहे. यामुळे धरणांच्या तालुक्यात कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाला सावरण्यासाठी शासनाने निकष शिथिल करून एकरी ५० हजार रुपये तातडीची थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *