![]()
चांदवड-मनमाड सीमेलगतच्या गोरखनगर फॉरेस्ट परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून ७ ते ८ संशयित व्यक्ती उतरल्याची माहिती सोशल मीडियावर पसरल्यानंतर बुधवारी (दि.१८) रात्री मनमाडसह नांदगाव, चांदवड तालुक्यांत खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर चांदवड व मनमाड पोलिसांसह नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री १० ते पहाटे ३ पर्यंत संयुक्त शोधमोहीम राबवली. मात्र, संशयित व्यक्तींच्या हालचालींबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. बुधवारी सायंकाळी ८ वाजेनंतर वन विभागाच्या परिसरात सशस्त्र संशयित दिसल्याचे संदेश सोशल मीडियावरून वेगाने पसरले. नांदगाव तालुक्यातील एकवई येथे मोठा दरोडा पडल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड, अंकाई, कातरवाडी, वडगाव पंगू, रापली, अनकवाडे आणि आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. इतर ठिकाणांहूनही मनमाडच्या नागरिकांना या वृत्ताबाबत विचारणा करण्यात आली. चांदवडचे पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे आणि मनमाड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम बस्ते, प्रदीप आजगे व पोलिस मुख्यालयातील तीन अंमलदार यांनी गोरखनगर फॉरेस्ट आणि लगतच्या परिसरात गस्त घातली.नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली सतीश जगताप, सचिन वराडे, सतीश घुटे, संदीप महाजन व किशोर बोडखे यांच्या पथकाने रात्री १२ वाजल्यानंतर परिसरात दाखल होत पाहणी केली. तिन्ही पथकांनी पहाटे ३ वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवली.दरम्यान, रानमळा तांडा व अनकवाडे परिसरातील सुमारे ४० ते ५० तरुणांनीही रात्री १० वाजेपर्यंत फॉरेस्टलगत पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व वन्य पशू-प्राणी मित्र भागवत झाल्टे, वनमजूर अंकुश गुंजाळ आणि अनकवाडे येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास आवटे उपस्थित होते.
Source link
दरोडेखोरांच्या वृत्ताने मनमाड परिसरात पोलिसांचा रात्री ते पहाटेपर्यंत शोध:गोरखनगर फॉरेस्टमध्ये 8 संशयित उतरल्याची समाजमाध्यमांवर माहिती