![]()
तालुक्यातील नागोसली येथे घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी गटाकडून राजकीय आकसापोटी विरोधी गटातील पात्र ग्रामस्थांना घरकुल योजनेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याचा, तर यापूर्वी लाभ घेतलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना पुन्हा घरकुल मंजूर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत गुरुवारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. नागोसली गावातील घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विरोधी गटातील असल्याने आपली घरकुले हेतुपुरस्सर नामंजूर करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, यापूर्वीच घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या काही व्यक्तींना पुन्हा घरकुल मंजूर करण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे, गावात बंगले आणि चारचाकी वाहने असलेल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनाही या योजनेचा लाभ देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. शासनाच्या घरकुल योजनेचा मूळ उद्देश बेघर, गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, नागोसली येथे पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना लाभ दिला जात असल्याचा आरोप होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे घरकुल मंजुरीची संपूर्ण यादी, लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांची प्रत्यक्ष पात्रता तपासावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी महेश वाळवी यांनी येत्या आठ दिवसांत ग्रामसभा घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. चौकशीनंतर केवळ पात्र लाभार्थ्यांनाच घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Source link
नागोसली येथे राजकीय आकसातून पात्र लाभार्थ्यांना घरकुले नाकारल्याचा आरोप:ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; 8 दिवसांत चौकशीचे आश्वासन