नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 2027 मध्ये होणारी नीट-यूजी परीक्षा पेन-पेपर पद्धतीने (ओएमआर शीट)च होण्याची शक्यता आहे. नीट पेपरफुटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गत मे महिन्यात घोषणा केली होती की, 2027 पासून ही परीक्षा संगणकाधारित (सीबीटी पद्धतीने) घेतली जाईल. मात्र, सध्या त्याची अंमलबजावणी कठीण दिसत आहे.
ही परीक्षा एनटीएला घ्यायची आहे. मात्र, ती पेन-पेपर पद्धतीने घ्यायची की सीबीटी पद्धतीने, याचा निर्णय आरोग्य मंत्रालय घेईल. मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की, नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतरच परीक्षेच्या पद्धतीबाबत निर्णय घेता येईल. परीक्षा सुधारणांशी संबंधित या समितीचा अहवाल आधी ऑक्टोबरमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र, आता तो जानेवारी 2027 पर्यंत येण्याची शक्यता आहे.
यानंतर सुमारे 25 लाख उमेदवारांसाठी संगणकाधारित परीक्षा घेण्यासाठी पुरेशी केंद्रे तयार करणे आणि परीक्षेच्या शिफ्टचे व्यवस्थापन करणे यांसारख्या कामांसाठी खूपच कमी वेळ उरेल.
22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी 20 शिफ्टचे आव्हान

ऑनलाइन परीक्षेचे आव्हान समजून घेण्यासाठी एनटीएच्या जेईई मेन परीक्षेशी तुलना करता येईल. जेईईच्या एप्रिल २०२६ सत्रासाठी ११.१० लाख नोंदणी झाली होती. ९ शिफ्टमध्ये ५८४ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. नीटसाठी २२.७ लाख विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल.
जेईई मेनच्या एप्रिल सत्राच्या सरासरीच्या आधारे एका शिफ्टमध्ये १.२३ लाख विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. हीच क्षमता नीटसाठी लागू केली तर तब्बल २० शिफ्ट होतील. दररोज दोन शिफ्ट झाल्यास परीक्षा १० दिवसांत पूर्ण होईल. संपूर्ण परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यासाठी १०,७५० केंद्रांची आवश्यकता असेल.
सीबीटी पद्धतीत 20 शिफ्टमध्ये परीक्षा घेतली, तर प्रत्येक शिफ्टसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करावी लागेल. काठिण्याच्या पातळीतील फरक संतुलित करण्यासाठी सामान्यीकरण आवश्यक असेल. जेईई मेनमध्ये ही व्यवस्था आहे. नीटमध्ये ती लागू करणे आव्हानात्मक ठरेल. नीटमधील निम्मे प्रश्न जीवशास्त्राचे असतात. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या विषयातील प्रश्नांच्या काठिण्याच्या पातळीचे मूल्यमापन करून समतोल साधणे सोपे नसेल.
यासोबतच संगणक, वीज, इंटरनेट, तांत्रिक कर्मचारी आणि परीक्षा केंद्रांच्या सुरक्षेची व्यवस्थाही करावी लागेल.
20 शिफ्टसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील

सध्याच्या परिस्थितीत एवढी मोठी परीक्षा एका शिफ्टमध्ये घेणे शक्य दिसत नाही. सीबीटीसाठी २० शिफ्ट्ससाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील. यासाठी आता फार कमी वेळ उरला आहे.
नीलेकणी समितीने सीबीटी मोडची शिफारस केली, तरी पेन-पेपरवरून थेट सीबीटीकडे जाण्याऐवजी हायब्रिड मोड हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.
मोठ्या आणि महानगरांमध्ये सीबीटीचा पर्याय देता येईल, तर छोट्या शहरांमध्ये एक-दोन वर्षे पेन-पेपर मोड सुरू ठेवता येईल. या काळात सीबीटी केंद्रांचे नेटवर्क हळूहळू वाढवून संपूर्ण परीक्षा सीबीटी मोडमध्ये आणता येईल. जेईईला पेन-पेपरवरून सीबीटी मोडमध्ये आणतानाही हायब्रिड मोडचा अवलंब करण्यात आला होता.
————