![]()
येत्या 21 नोव्हेंबरला असलेल्या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दाखल होत आहेत. या भाविकांच्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाने सुमारे 1 हजार जादा बसेस सज्ज ठेवल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिक शुक्ल पक्षातील या प्रबोधिनी एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून या दिवशी जागे होतात, अशी धार्मिक श्रद्धा असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भाविक पंढरीत येतात. यामुळे चंद्रभागेच्या पवित्र तीरावर भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनुपम सोहळा पाहायला मिळत आहे. चंद्रभागा बसस्थानकातून जादा फेऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून राज्यातील विविध भागांसाठी जादा बसफेऱ्यांचे विशेष नियोजन केले आहे. दर्शनानंतर भाविकांना आपल्या गावी सुखरूप परतण्यासाठीही पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला महामंडळाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन एसटीच्या माध्यमातून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेत भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘लालपरी’ सदैव सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Source link
वारकऱ्यांचा प्रवास होणार सुखकर!:कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार 1 हजार जादा 'लालपरी'; सरकारचा मोठा निर्णय