![]()
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासाठी आणलेला औषधसाठा निकृष्ट आढळला. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महापालिकेच्या मध्यवर्ती औषध भांडारातून 1 कोटी 72 लाख रुपयांची औषधे जप्त केली. काही औषधांच्या निर्मितीसाठी कंपनीकडे वैध परवाना नव्हता. कंपनीवर छापा टाकून आणखी 18 लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली. एकूण 1 कोटी 90 लाख रुपयांचा साठा जप्त झाला. पुण्याचे औषध निरीक्षक एस. एस. बुगाड यांनी वायसीएम रुग्णालय परिसरातील मध्यवर्ती औषध भांडारातून नमुने घेतले होते. प्रयोगशाळेच्या तपासणीत काही औषधे ठरवलेल्या मानकांनुसार नसल्याचे आढळले. औषधांतील घटक, विरघळण्याची क्षमता, वजन आणि आवरणावरील माहितीमध्ये त्रुटी होत्या. कागदपत्रे तपासल्यानंतर काही औषधांच्या निर्मितीसाठी कंपनीकडे आवश्यक परवानगी नसल्याचेही समोर आले. त्यानंतर एफडीएने इंदापूर तालुक्यातील जेजुरी औद्योगिक वसाहतीत असलेल्या मे. इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च फाउंडेशनवर छापा टाकला आणि तेथील औषधसाठा जप्त केला. औषधे बाजारातून परत मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, तिच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. कंपनीने महापालिकेच्या इतर रुग्णालयांनाही औषधे पुरवली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रुग्णालयांतील औषधसाठाही तपासून कारवाई केली जाईल, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली. महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. त्यामुळे औषध खरेदी, गुणवत्ता तपासणी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Source link
वायसीएम रुग्णालयातील औषधांचा साठा निकृष्ट आढळला:एफडीएने 1.90 कोटींची औषधे जप्त केली; उत्पादक कंपनी काळ्या यादीत