Headlines

मुंबईहून चिपळूणला जाताना काळाचा घाला:चालकाला डुलकी लागली, महामार्गावर कार उलटून दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी




रात्रीच्या प्रवासात वाहन चालवताना येणारी क्षणभराची डुलकी किती जीवघेणी ठरू शकते, याची भीषण घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. मुंबईहून चिपळूणकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारला पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाला. चालकाला अचानक डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर दोन ते तीन वेळा पलटी झाली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एका 13 वर्षांच्या मुलासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या सुरूर गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री हा अपघात घडला. वैष्णवी वैभव कदम (वय 43) आणि विजय धोंडू पवार (वय 70) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण मुंबईहून चिपळूणला जाण्यासाठी मोटारीने प्रवास करत होते. मात्र, गावी पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. चालकाला डुलकी लागली अन् कारवरील नियंत्रण सुटले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम आणि पवार कुटुंबीय MH 14 BK 7933 क्रमांकाच्या मोटारीने मुंबईहून चिपळूणच्या दिशेने निघाले होते. वैभव वामन कदम (वय 45, रा. चिपळूण) हे मोटार चालवत होते. प्रवासादरम्यान त्यांची गाडी पुणे-बंगळुरू महामार्गावरून वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत पोहोचली. याच दरम्यान चालक वैभव कदम यांना डुलकी लागली. त्यामुळे काही क्षणांतच गाडीवरील त्यांचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील मोटार थेट महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की, मोटार दोन ते तीन वेळा पलटी झाली. या अपघातात गाडीतील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. दोन जणांचा जागीच मृत्यू, 13 वर्षांचा मुलगाही जखमी या अपघातात वैष्णवी वैभव कदम आणि विजय धोंडू पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चालक वैभव वामन कदम, वैशाली विजय पवार (वय 62) आणि वेदांत वैभव कदम (वय 13) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मोटारीतील जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत करण्यात आली. त्यानंतर तिन्ही जखमींना तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. भुईंज पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत आवश्यक माहिती घेतली जात आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांचा प्रवास सुरू असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे चिपळूण परिसरात शोककळा पसरली आहे. महामार्गावरील वाहतूक बदलही ठरताहेत अपघातांना कारणीभूत दरम्यान, पुणे-बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने पुणे ते सातारा दरम्यान अनेक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी उड्डाणपुलांवरून तर काही ठिकाणी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी कामे अद्याप अपूर्ण असल्याने वाहनचालकांना रस्त्याच्या बदललेल्या रचनेचा अंदाज येत नाही. परिणामी, वेगात असलेल्या वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका वाढत आहे. मात्र, या अपघातात चालकाला आलेली डुलकी हे प्राथमिक कारण समोर आले आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करताना पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. क्षणभराच्या निष्काळजीपणामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला, तर एकाच कुटुंबातील अन्य तिघांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. हेही वाचा…. अदाणींच्या तारळी प्रकल्पाला दुहेरी दणका:वनविभागानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही काम बंदचे आदेश, परिसरात ‘नो एन्ट्री’चे फलक सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या अदाणी ग्रीन एनर्जीच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवत वनविभागाने यापूर्वीच प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही सावरघर येथील उत्खनन आणि बांधकामाला तात्काळ स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरणविषयक आवश्यक पूर्वपरवानगी न घेता काम सुरू असल्याचे निरीक्षण मंडळाने नोंदवले आहे. दरम्यान, कंपनीनेही सावरघर येथील संबंधित कामे तात्पुरती थांबवली असून, तारळी धरण परिसरात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र आणि ‘नो एन्ट्री’चे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाभोवतीचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *