Headlines

कवठीत 1.25 कोटींची सुसज्ज अभ्यासिका उभारली:विजय वडेट्टीवारांच्या हस्ते उद्घाटन, ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार हक्काची जागा




ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. मात्र, त्यांना योग्य शैक्षणिक सुविधा आणि संधी मिळणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी गावातच दर्जेदार अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याच उद्देशाने कवठी येथे उभारण्यात आलेली अभ्यासिका भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. सावली तालुक्यातील नवेगाव आणि कवठी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या दौऱ्यादरम्यान सुमारे दीड कोटी रुपयांच्या विकासकामांना चालना देण्यात आली. नवेगाव येथे जनसुविधा योजनेअंतर्गत 20 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण करण्यात आले. तर कवठी येथे 1 कोटी 25 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य अभ्यासिकेचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, शांत वातावरण आणि सुसज्ज जागेचा अभाव यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, चांगल्या अभ्यासाच्या सुविधा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शहरांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी कवठी येथे सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या अभ्यासिकेमुळे कवठी गावासह परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखण्याची गरज यावेळी बोलताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि जिद्द यांची कमतरता नाही. अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेत आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. विद्यार्थ्यांना योग्य वातावरण, अभ्यासासाठी जागा आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास ते निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात. कवठी येथील अभ्यासिकेचा उपयोग करून परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे. या अभ्यासिकेतून भविष्यात प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, अभियंते आणि विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्ती घडाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवेगावला सुसज्ज ग्रामपंचायत भवनाची सुविधा नवेगाव येथे जनसुविधा योजनेअंतर्गत 20 लाख रुपये खर्चून ग्रामपंचायत भवन उभारण्यात आले आहे. या भवनामुळे गावाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक सक्षम आणि नियोजनबद्ध स्वरूप मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधताना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज जागा निर्माण झाली आहे. गावाच्या विकासासाठी सक्षम स्थानिक प्रशासन महत्त्वाचे असून, या भवनामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारालाही विकासात प्राधान्य ग्रामीण भागाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि मूलभूत सुविधांची उभारणी नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक प्रगती या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास होणे आवश्यक आहे. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यासोबतच तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जनतेच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन केले जात असून, आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली. या विकासकामांमुळे नवेगाव आणि कवठी परिसरातील नागरिकांना प्रशासकीय तसेच शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. विशेषतः कवठी येथील 1 कोटी 25 लाख रुपयांच्या अभ्यासिकेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठा आधार मिळणार आहे. शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांचा लाभ आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गावातच घेता येणार आहे. त्यामुळे ही अभ्यासिका केवळ अभ्यासाची जागा न राहता ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हेही वाचा…. ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे जयकुमार गोरेंनाच विचारा’:DCC बँकेच्या वादातून शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेला वाद आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा उफाळून आला आहे. राज्याचे मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानाला मिश्कील शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘हा अघोरी बाबा कुठे मिळतो, हे त्यांनाच विचारावे लागेल. त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल, तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन,’ असा टोला देसाईंनी लगावला. त्यामुळे साताऱ्यातील महायुतीमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *