Headlines

'विलासरावांना बदनाम करण्यासाठी रेल्वेने पाणी आणलं:अमित देशमुखांचा आरोप, भाजपचा पलटवार; 'आधी लातूरचा पाणीप्रश्न सोडवा'




लातूर शहरातील पाणीटंचाई आणि 2016 मध्ये मिरज येथून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना बदनाम करण्यासाठी त्यावेळी रेल्वेने लातूरला पाणी आणण्याचा राजकीय डाव रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, लातूरचा पाणीप्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत अमित देशमुख यांना आगामी पंचवार्षिक योजनेत पाणीप्रश्न कायमचा सोडवण्याचे आव्हान दिले आहे. 2016 मध्ये लातूर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील मिरज येथून विशेष रेल्वेद्वारे लातूरला पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘जलदूत’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेने लातूरकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा केला होता. या घटनेला आता दहा वर्षे होत असताना 2026 मध्ये पुन्हा एकदा पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार अमित देशमुख यांनी 2016 मधील रेल्वे पाणीपुरवठ्याच्या घटनेमागील राजकारणावर भाष्य केले. ‘विलासराव देशमुखांना बदनाम करण्यासाठी राजकीय षडयंत्र’ लातूर येथील एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख यांनी 2016 मध्ये रेल्वेने पाणी आणण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे लातूरचे होते. मात्र, त्यांच्या कार्यकाळात लातूरचा पाणीप्रश्न सुटला नाही, असे समाजासमोर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा राजकीय डाव आखण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. “ते षडयंत्र होतं. ते राजकारण होतं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख लातूरचे होते. त्यांना हे पाणी आणणं जमलं नाही, हे समाजाला दाखवायचं होतं. अपप्रचार करायचा होता. म्हणून लातूरला ट्रेनने पाणी पाठवलं. आता लातूरला ट्रेनने पाणी येणार नाही. ट्रेन मागितली तरी आता मिळणार नाही. मागून बघा,” अशा शब्दांत अमित देशमुख यांनी त्यावेळच्या परिस्थितीवर भाष्य केले. त्यांच्या या विधानामुळे 2016 मधील जलदूत रेल्वेचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी केंद्रात भाजपप्रणित एनडीएचे सरकार होते, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर होते. त्यामुळे अमित देशमुख यांच्या आरोपातून तत्कालीन सरकारच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 11 एप्रिल 2016 रोजी लातूरमध्ये पोहोचली होती पहिली जलदूत लातूरमधील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन 2016 मध्ये मिरज येथून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 11 एप्रिल 2016 रोजी मिरज येथून पहिली जलदूत रेल्वे लातूरच्या दिशेने रवाना झाली. सुमारे 342 किलोमीटरचे अंतर पार करून ही रेल्वे लातूरमध्ये पोहोचली होती. या रेल्वेच्या प्रत्येक वॅगनची पाणी वाहून नेण्याची क्षमता 50 हजार लिटर होती. सुरुवातीला 10 वॅगनच्या माध्यमातून पाणी आणण्यात आले. त्यानंतर या रेल्वेला 50 वॅगन जोडण्यात आल्या. या विशेष रेल्वेच्या 100 हून अधिक फेऱ्यांमधून लातूर शहरात 24 ते 25 कोटी लिटरहून अधिक पिण्याचे पाणी पोहोचवण्यात आले होते. त्यामुळे त्या काळात लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला होता. भाजपचे नवनाथ बन यांचे अमित देशमुखांना प्रत्युत्तर अमित देशमुख यांच्या आरोपानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. लातूरला पाणी देण्याच्या निर्णयालाही आता राजकीय षडयंत्र म्हटले जात असल्याचे सांगत त्यांनी अमित देशमुख यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आता लातूरला पाणी देणं हेदेखील राजकीय षडयंत्र वाटतंय. माझा अमित देशमुखांना सवाल आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून लातूरचे प्रतिनिधित्व करत आहात. तुम्हाला साधा लातूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही,” अशा शब्दांत नवनाथ बन यांनी टीका केली. तसेच लातूरमध्ये आज जवळपास महिनाभराने पाऊस येतो, अशी परिस्थिती असल्याचे सांगत त्यांनी शहराच्या पाणीप्रश्नावरून देशमुख यांना लक्ष्य केले. केवळ पूर्वीच्या सरकारांवर आरोप करण्याऐवजी लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘हिंमत असेल तर पाणीप्रश्न कायमचा सोडवा’ नवनाथ बन यांनी अमित देशमुख यांना थेट आव्हानही दिले. “अमित देशमुख यांच्यात हिंमत असेल तर येणाऱ्या पंचवार्षिक योजनेत लातूर शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटवा,” असे आव्हान त्यांनी दिले. एकीकडे अमित देशमुख यांनी 2016 मध्ये रेल्वेने पाणी आणण्यामागे तत्कालीन राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे भाजपने त्यांच्या नेतृत्वावर आणि लातूरमधील पाणीप्रश्न हाताळण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे दहा वर्षांपूर्वीच्या जलदूत रेल्वेच्या आठवणीवरून आता लातूरमध्ये नवा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना कोणते वळण मिळते आणि लातूरचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. अदाणींच्या तारळी प्रकल्पाला दुहेरी दणका:वनविभागानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही काम बंदचे आदेश, परिसरात ‘नो एन्ट्री’चे फलक सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या अदाणी ग्रीन एनर्जीच्या 1,500 मेगावॅट क्षमतेच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवत वनविभागाने यापूर्वीच प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही सावरघर येथील उत्खनन आणि बांधकामाला तात्काळ स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरणविषयक आवश्यक पूर्वपरवानगी न घेता काम सुरू असल्याचे निरीक्षण मंडळाने नोंदवले आहे. दरम्यान, कंपनीनेही सावरघर येथील संबंधित कामे तात्पुरती थांबवली असून, तारळी धरण परिसरात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र आणि ‘नो एन्ट्री’चे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाभोवतीचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *