![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि जागतिक व्यासपीठावरील भारताच्या स्थानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ‘2014 पूर्वीचा भारत’ आणि ‘2014 नंतरचा भारत’ यातील फरक स्पष्ट करण्यासाठी चव्हाण यांनी दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमधील छायाचित्रे शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या आरोपांना उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी जागतिक परिषदांमधील भारताच्या प्रतिनिधित्वाची तुलना केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी शेअर केलेल्या पहिल्या छायाचित्रात 2011 मध्ये फ्रान्स येथे झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक नेत्यांच्या मागील रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. याउलट, 2024 मध्ये रिओ दि जानेरो येथे पार पडलेल्या G20 परिषदेतील दुसऱ्या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांच्या मध्यभागी उभे असल्याचे नमूद करत, मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झाली आहे. या सत्तेच्या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा. कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही.
Source link
'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी केल्यास याद राखा':रवींद्र चव्हाण यांचा राहुल गांधींना इशारा, फोटो शेअर करत केली टीका