Headlines

दिवंगत अजितदादांबद्दल बेताल वक्तव्य चळवळीच्या नेत्याला शोभत नाही:हसन मुश्रीफांकडून आनंदराज आंबेडकरांचा जाहीर निषेध




दिवंगत नेते अजित पवार यांच्याबद्दल आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “स्वर्गवासी झालेल्या एका मोठ्या नेत्याबद्दल अशा पद्धतीचे दुर्दैवी विधान करणे आणि विनाकारण वाद ओढवून घेणे हे रिपब्लिकन चळवळीच्या नेत्याला अजिबात शोभणारे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो,” अशा शब्दांत मुश्रीफ यांनी सोमवारी (23 नोव्हेंबर) कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना फटकारले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेमागील नेमके सत्य, राष्ट्रवादीचे विलीनीकरण, नरहरी झिरवाळ यांचे ‘लाडकी बहीण’ योजनेवरील विधान, कागल-करवीर तालुक्यांचा दुष्काळ आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीवर सविस्तर भाष्य केले. शरद पवारांचा फोन राजकारणासाठी नव्हता; त्यांनी 90 टन ऊस उत्पादनाबद्दल अभिनंदन केले! गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यात फोनवर झालेल्या संवादावरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. यावर मुश्रीफ यांनी पूर्णविराम लावला. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) उसाचे उत्पादन वाढू शकते हे आता सिद्ध झाले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि व्हीएसआयच्या (VSI) धर्तीवर गेल्या वर्षीपासून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने हा प्रयोग राबवला आहे. स्वतः मुश्रीफ यांनी आपल्या शेतात हा प्रयोग केला असून, पार्थ पवार यांच्या साखरपुड्याच्या दिवशी शरद पवार यांनी त्यांना बोलावून या प्रयोगाचे विस्तारीकरण करण्याची सूचना केली होती. शेतकऱ्यांसाठी 9900 रुपयांची तरतूद कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुमारे 2000 एकर शेतीवर हा प्रयोग राबवताना शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारी प्रतिशेतकरी 9900 रुपयांची संपूर्ण रक्कम कारखान्याच्या नफ्यातून भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. फोंड्या माळावर 90 टन उत्पादन या प्रयोगामुळे फोंड्या माळासारख्या खडकाळ जमिनीतही एकरी 90 टन इतके विक्रमी ऊस उत्पादन मिळाले, तर चांगल्या जमिनीत 100 ते 125 टन उत्पादन मिळण्याची खात्री आहे. ही बातमी समजताच शरद पवार यांनी फोन करून माझे अभिनंदन केले आणि याचा राज्यभर प्रसार करण्याचे आवाहन केले. या वयातही त्यांचे शेती व शेतकऱ्यांवरील प्रेम पाहून भारावून गेलो; याशिवाय आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया दादांच्या जाण्याने थांबली; एनडीए प्रवेशाबाबत मुंबईत कळेल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या आणि डिलिमिटेशनच्या चर्चेवर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, “ज्यावेळी विलीनीकरणाची चर्चा सुरू होती तेव्हा अजितदादा हयात होते, मात्र दादांच्या अकाली जाण्याने ही प्रक्रिया थांबली. आमच्या पक्षाने सुरुवातीपासूनच विलीनीकरण होणार नाही अशी भूमिका घेतली होती आणि नंतर शरद पवार गटानेही तीच भूमिका घेतली. आता डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवार गट एनडीएला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होणार का, हे मी प्रसारमाध्यमांत वाचले आहे; मुंबईला गेल्यावर नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल.” झिरवाळांच्या विधानावर नाराजी; मायक्रो फायनान्स एजंटांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार! राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही मुश्रीफ यांनी रोखठोक भूमिका मांडली. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याची आर्थिक ओढाताण होत असली, तरी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ असा शब्दप्रयोग टाळायला हवा होता. ज्या लाडक्या बहिणींनी आपल्याला सत्तेवर आणले, त्यांना दिलेला शब्द पाळणे ही आमची जबाबदारी आहे, असे मुश्रीफ म्हणाले. 87 ते 88 टक्के शेतकऱ्यांना दुष्काळी मदत; कागल-करवीरचा समावेश करणार राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांत ज्यांचे सातबारे व ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी पूर्ण आहेत, अशा 87 ते 88 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. आजरा, गगनबावडा (जिथे सरासरी 3000 ते 4000 मिमी पाऊस पडतो), चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी हे तालुके 50 टक्के पावसाच्या निकषात बसल्याने दुष्काळग्रस्त जाहीर झाले. मात्र, कागल आणि करवीर तालुक्यांत पाऊस झाला असला तरी ऐन पीक वाढीच्या व फुलोऱ्याच्या काळात पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी बैठकीत मी आणि करवीरचे आमदार मिळून या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून घेऊ. शेतकऱ्याला ‘मर’ म्हणणाऱ्या मायक्रो फायनान्स एजंटवर गुन्हा कर्ज वसुलीसाठी गेलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या एजंटने एका शेतकऱ्याला ‘मर’ असा दम दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आणि दुष्काळ संपेपर्यंत कंपन्यांनी वसुली एजंट थांबवावेत, अन्यथा थेट फौजदारी खटले दाखल करण्याचे कडक आदेश दिले आहेत. वाहतूक संप व गोकुळचे राजकारण राज्यातील वाहतूकदारांचा संप तात्काळ मिटवण्यासाठी आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवर चर्चा करून विनंती केली आहे. तसेच, गोकुळ दूध संघाचे नवे अध्यक्ष राजेश पाटील यांनी प्रशासक काळातील तोट्याची चौकशी सुरू केली असून, आगामी बैठकीत संचालक मंडळ त्यावर आक्रमकपणे भूमिका मांडेल. दरम्यान, कोल्हापूरच्या महापौरपदाच्या कालावधीवरून महापौर स्वतः 1.25 वर्षे (15 महिने) तर राजेश क्षीरसागर यांनी 10 महिने असा फॉर्म्युला सांगितल्याच्या प्रश्नावर, “मी दोघांनाही भेटून एकत्र बसून यावर मार्ग काढेन,” असे मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच स्थानिक आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमावरून केलेल्या टीकेवर, “माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे, मी यावर अधिक बोलणे उचित समजत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. —————————————— हेही वाचा… डिलिमिटेशनसाठी 150 कोटींचे आरोप बालिशपणाचे, मग सुळेंनाही पैसे दिले का?: आरोप खोटे निघाल्यास नार्वेकर राऊतांना समज देतील- संजय शिरसाट राहुल नार्वेकरांनी जबरदस्तीने काही जमिनी बळकावल्या असल्याच्या तक्रारी जर संजय राऊत यांच्याकडे आल्या असतील आणि त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असेल, तर मुख्यमंत्री त्यावर नक्कीच चौकशी करतील. परंतु, हे आरोप खोटे निघाले, तर नार्वेकर हे स्वतः वकील आहेत, ते राऊतांना योग्य ती समज देतील, असे प्रत्युत्तर मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *