![]()
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. खरातसोबत विविध राजकीय नेत्यांचे फोटो आणि त्यांच्याशी संबंधित कार्यक्रमांतील उपस्थिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता याच प्रकरणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. शिवसेना (शिंदे गटाचे) नेते रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील आणि अशोक खरात यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील हे अशोक खरातच्या पाया पडताना दिसत असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. या फोटोचा आधार घेत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, रुपाली चाकणकर यांच्याबाबतीत एक निकष लावला जात असेल, तर तोच निकष चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीतही लागू व्हायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. धंगेकरांचा थेट सवाल; चंद्रकांत पाटलांना वेगळा न्याय का? रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणात सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशोक खरातसोबतच्या संबंधांवरून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका झाली. खरातसाठी छत्री धरल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मग अशोक खरातच्या पाया पडताना दिसणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का लावला जात आहे, असा सवाल धंगेकर यांनी केला. ‘देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रुपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावण्यात आला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खरातने वेगळा टेबल मांडला होता का, असा उपरोधिक सवाल करत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. त्यामुळे खरात प्रकरणावरून आता महायुतीमधील राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बावनकुळेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची बाजू धंगेकरांच्या या आरोपांनंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांची बाजू घेत धंगेकरांच्या टीकेला उत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांच्या सार्वजनिक आणि सामाजिक जीवनाचा संदर्भ देत त्यांनी धंगेकरांच्या आरोपांना फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे सूचित केले. ‘धंगेकर हे रोज कोणत्याही विषयावर राजकीय टीका करतात. चंद्रकांतदादांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपले जीवन वाहून घेतले आहे. दादा संस्कारमय जीवन जगले आहेत. त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला, तर धंगेकर टीका करणार नाहीत,’ असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांच्या या प्रतिक्रियेतून भाजपने चंद्रकांत पाटील यांच्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, धंगेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी थेट राजीनाम्याबाबत भाष्य केलेले नाही. खरात प्रकरणाला राजकीय वळण; पुढे काय होणार? अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो, भेटीगाठी आणि विविध कार्यक्रमांतील उपस्थिती यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित फोटो आणि आरोपांमुळे त्यांना पद सोडावे लागले. आता चंद्रकांत पाटील यांचा फोटो समोर आणत धंगेकर यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे धंगेकर समान निकष लावण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचा दाखला देत त्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणात केवळ संबंधित व्यक्तींवरच नव्हे, तर राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरूनही नवे वाद निर्माण होत आहेत. धंगेकरांच्या मागणीवर भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि या फोटोवरून पुढील काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होतो का, याकडे आता लक्ष लागले आहे. हेही वाचा…. रोहित पवारांनी पहिला मोर्चा स्वतःच्या बारामती ॲग्रोवर काढावा:परिणय फुके यांचा हल्लाबोल; म्हणाले- तिथल्या शेतकऱ्यांचे थकीत पैसे आधी द्यावेत हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा काढण्याची तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेते परिणय फुके यांनी सोमवारी (23 नोव्हेंबर ) नागपुरातून जोरदार निशाणा साधला. “रोहित पवारांना खरोखरच शेतकऱ्यांबद्दल कळवळा आणि संवेदनशीलता असेल, तर त्यांनी पहिला मोर्चा स्वतःच्या बारामती ॲग्रोवर काढावा; कारण बारामती ॲग्रोने अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्यांनी आधी तिथल्या शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत आणि उसाचे भाव वाढवून द्यावेत,” असा सणसणीत टोला फुके यांनी लगावला. यासोबतच गोवारी समाजाच्या 32 व्या शहीद स्मृतिदिनानिमित्त बोलताना त्यांनी गोवारी आरक्षणाच्या लढ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे (कॉन्स्टिट्यूशनल बेंच) दाद मागणार असल्याचे जाहीर केले आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीविरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती दिली. सविस्तर वाचा…..
Source link
अशोक खरातसोबतच्या फोटोवरून चंद्रकांत पाटील अडचणीत?:धंगेकरांच्या राजीनाम्याच्या मागणीला बावनकुळेंचे प्रत्युत्तर