![]()
पोलीस ठाण्यातील कोठडीत असलेल्या 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे घडली आहे. अमित रमेश चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून, तो अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी येथील रहिवासी होता. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात किनगाव पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, अटकेच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे त्याने पोलीस ठाण्यातील खोलीत गळफास घेऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून, मृताच्या नातेवाईकांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित चव्हाण याला संबंधित प्रकरणात पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला किनगाव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यातील एका खोलीत त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. लातूरचे पोलीस अधीक्षकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांचा घातपाताचा संशय; पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दरम्यान, अमितच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना समजताच नातेवाईकांनी किनगाव पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. अमितने आत्महत्या केली नसून त्याच्यासोबत काहीतरी चुकीचा प्रकार घडला असावा, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमागील सत्य समोर आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर काही काळ ठिय्या दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरण सीआयडीकडे; इन कॅमेरा शवविच्छेदन पोलीस ठाण्याच्या आवारातच आरोपीचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट व्हावे, यासाठी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, मृत अमित चव्हाण याच्या पार्थिवाचे लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलीस कोठडीतील मृत्यूच्या घटनांमुळे पुन्हा प्रश्नचिन्ह पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित पोलीस यंत्रणेवर असते. अशा परिस्थितीत पोलीस ठाण्यातच तरुणाचा मृत्यू झाल्याने कोठडीतील सुरक्षेचा आणि देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूच्या घटनेने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचीही स्थापना करण्यात आली होती. आता लातूरमधील या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस कोठडीतील आरोपींच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमित चव्हाण याचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, त्यावेळी पोलीस ठाण्यात कोणाची ड्युटी होती आणि संबंधित खोलीत सुरक्षेची काय व्यवस्था होती, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला असून, सीआयडी तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच या घटनेचे नेमके वास्तव स्पष्ट होणार आहे. हेही वाचा… अशोक खरातसोबतच्या फोटोवरून चंद्रकांत पाटील अडचणीत?:धंगेकरांच्या राजीनाम्याच्या मागणीला बावनकुळेंचे प्रत्युत्तर भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. खरातसोबत विविध राजकीय नेत्यांचे फोटो आणि त्यांच्याशी संबंधित कार्यक्रमांतील उपस्थिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता याच प्रकरणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…..
Source link
लातूरमध्ये पोलीस कोठडीत 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या:अटकेच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, नातेवाईकांचा घातपाताचा आरोप