Headlines

अमरावतीत व्हॉयेजर-1च्या ‘लाइट-डे’निमित्त मोबाईल फ्लॅश चमकवले:मराठी विज्ञान परिषद आणि स्टारगेझर क्लबचा उपक्रम; मॉर्स कोडमध्ये ‘V-G-R’ संदेश दिला




नासाचे व्हॉयेजर-१ अंतराळयान पृथ्वीपासून एक प्रकाश-दिवस दूर पोहोचल्याच्या निमित्ताने अमरावतीत मोबाईलचे फ्लॅश आकाशाच्या दिशेने चमकवण्यात आले. छत्री तलाव रोडवरील गणेश विसर्जन मैदानात सायंकाळी ६.३० नंतर हा उपक्रम झाला. व्हॉयेजर-१ गेल्या ४९ वर्षांपासून अवकाशात प्रवास करत आहे. मानवाने बनवलेली कोणतीही वस्तू यापूर्वी इतक्या दूर पोहोचली नव्हती. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘लाइट-डे’निमित्त हा उपक्रम केला. व्हॉयेजर-१ने ५ सप्टेंबर १९७७ रोजी अवकाशात झेप घेतली. १७ नोव्हेंबरला त्याने पृथ्वीपासून एक प्रकाश-दिवसाचे अंतर गाठले. या टप्प्याच्या स्वागतासाठी नासाने सूर्यास्तानंतर टॉर्च, मोबाईल फ्लॅश किंवा अन्य प्रकाशस्रोताने मॉर्स कोडमध्ये ‘V-G-R’ अक्षरे चमकवण्याचे आवाहन केले होते. ही अक्षरे व्हॉयेजर मोहिमेचा अधिकृत सांकेतिक संदेश आहेत. नासाने मोबाईलवर वापरण्यासाठी स्वयंचलित फ्लॅशर टूलही उपलब्ध करून दिले होते. पृथ्वीवरून पाठवलेला रेडिओ संदेश व्हॉयेजर-१पर्यंत पोहोचायला २४ तास लागतात. त्यामुळे १७ नोव्हेंबरला दिलेला प्रकाश संदेश १८ नोव्हेंबरच्या टप्प्याच्या स्वागताचे प्रतीक होता. व्हॉयेजर-१चे कॅमेरे १९९० मध्येच बंद करण्यात आले होते. त्यामुळे यानाला हा प्रकाश दिसू शकला नाही. हा उपक्रम वैज्ञानिक प्रगती आणि अंतराळ संशोधनातील जिद्दीचा प्रतीकात्मक जागतिक उत्सव ठरल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. प्रवीण गुल्हाने आणि खगोलीय विभाग प्रमुख विजय गिरुळकर यांनी सांगितले. स्टारगेझर क्लबच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात शहरातील हौशी खगोल अभ्यासक सहभागी झाले. यात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमींचा समावेश होता. मॉर्स कोडनुसार ‘V’साठी तीन छोटे आणि एक मोठा प्रकाशझोत, ‘G’साठी दोन मोठे आणि एक छोटा प्रकाशझोत, तर ‘R’साठी एक छोटा, एक मोठा आणि पुन्हा एक छोटा प्रकाशझोत द्यायचा होता. प्रकाशाच्या माध्यमातून व्हॉयेजरला मानवतेचा प्रतीकात्मक संदेश देणे हा या कृतीचा उद्देश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *