![]()
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी. तसेच, कोणतेही ठोस पुरावे नसताना या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव जोडणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यासाठी उमेदवारांकडे लाखो रुपयांची मागणी करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. महाविद्यालयातील माजी कंत्राटी प्राध्यापक डॉ. प्रवीण तायडे आणि कंत्राटी सहयोगी प्राध्यापक डॉ. अमिता साळे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये लाच मागितल्याचे आणि पैसे दिल्याचे दावे केले आहेत. या दाव्यांची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचे बिडकर यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाचे नावही घेतले जात आहे. मात्र, कार्यालयाचा कथित गैरव्यवहाराशी संबंध असल्याचे दर्शविणारे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे पुराव्यांशिवाय मुख्यमंत्री कार्यालयाची बदनामी करणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी व्हावी. आरोप सिद्ध न करता नावे जोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बिडकर यांनी केली आहे. भरती प्रक्रियेतील आरोपांची सत्यता निष्पक्ष चौकशीतून समोर यावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
Source link
वैद्यकीय महाविद्यालयातील भरती गैरव्यवहाराची चौकशी करा:मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव पुराव्याशिवाय जोडणाऱ्यांवरही कारवाईची गणेश बिडकर यांची मागणी