![]()
शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीडीसीसी) वसतिगृहात रॅगिंगचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी १९ वर्षीय नवप्रवेशित विद्यार्थ्याला मुलीचे कपडे घालण्यास, सहकारी विद्यार्थ्याला प्रपोज करण्यास आणि मेसमधील उष्टे अन्न खाण्यास भाग पाडले. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत सुरू असलेल्या या अमानुष छळाप्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानंतर तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले आहे. तक्रारदार विद्यार्थी उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील कमहरिया येथील रहिवासी आहे. नीट परीक्षेत देशात ५५२ वा क्रमांक मिळवून त्याने नागपूरच्या जीडीसीसीमध्ये बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. २६ ऑक्टोबरला तो वसतिगृहात राहायला आला. त्याच रात्री साडेआठच्या सुमारास खोली क्रमांक १०४ मध्ये काही वरिष्ठ विद्यार्थी आले. पीडित विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले आहे की, “स्वत:ला वर्गप्रतिनिधी (सीआर) म्हणवणाऱ्या विद्यार्थ्याने मला टोपी काढून डोके खाली घालण्यास सांगितले. इतरांनी कोंबडा होण्यास आणि कपडे काढण्यास भाग पाडले. अश्लील शेरेबाजी करत अनुचित स्पर्श केला. दोन वरिष्ठांनी मुलींचे कपडे घालून दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रपोज करायला लावले. दारूची बाटली आणणे, खोली साफ करणे आणि अश्लील व्हिडिओ दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. विद्यार्थ्याची यापूर्वी अधिष्ठातांकडे ई-मेलद्वारे तक्रार विद्यार्थ्याने यापूर्वी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. अँटी रॅगिंग समिती व पथकाकडून चौकशीची मागणी केली होती. वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतर टाळाटाळ केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या मावशीने केला आहे. यूजीसीची अँटी रॅगिंग हेल्पलाइन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडेही तक्रारी केल्या आहेत. एका खोलीत दोन ते तीन विद्यार्थ्यांची व्यवस्था असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात सुमारे १४ विद्यार्थी राहत असल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.
Source link
नागपुरात रॅगिंग; विद्यार्थ्यास मुलीचे कपडे घालून छळ:तीन विद्यार्थ्यांची हकालपट्टी, डेंटल कॉलेजमधील प्रकार