![]()
हवामान बदल, वाढती लोकसंख्या, पोषणाच्या समस्या आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास ही भविष्यातील अन्नसुरक्षेसमोरील आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी शेतीत शाश्वत पद्धती, हवामानाला अनुकूल पिकांची लागवड, पाण्याचे योग्य नियोजन आणि अन्नाची नासाडी रोखणे गरजेचे
.
पुण्यातील यशदा येथे ‘वनस्पती जनुक अभियांत्रिकी, चयापचयशास्त्र आणि शाश्वत अन्नव्यवस्था’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फूड टेक्नॉलॉजी, सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे, सोसायटी फॉर प्लांट बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी आणि नवी दिल्लीतील सोसायटी फॉर प्लांट बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी यांनी परिषदेचे आयोजन केले.
परिषदेच्या निमित्ताने झालेल्या डॉ. एन. बी. दास स्मृती व्याख्यानात प्रा. मांडे बोलत होते. ‘शेती, अन्न आणि पोषणातील शाश्वतता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
कार्यक्रमाला एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., आयसीएआरचे राष्ट्रीय प्राध्यापक, बी. पी. पाल चेअर आणि एसपीबीबीचे अध्यक्ष प्रा. टी. आर. शर्मा, विद्यापीठाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय हरसुलकर, स्कूल ऑफ फूड टेक्नॉलॉजीच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. अंजली ए. भोईटे आणि सीएसआयआर-एनसीएलचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र कडू उपस्थित होते.
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होत असले, तरी कुपोषणाची समस्या कायम असल्याचे प्रा. मांडे यांनी सांगितले. भारतात बालकांची खुंटलेली वाढ आणि महिला व बालकांमधील रक्तक्षयाच्या समस्या आहेत. त्याचवेळी लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या अतिपोषणाशी संबंधित आजारांचे प्रमाणही वाढत आहे.
अन्नसुरक्षा म्हणजे केवळ पुरेसे अन्नधान्य उपलब्ध असणे नव्हे, तर प्रत्येकाला संतुलित आणि पौष्टिक आहार मिळणेही महत्त्वाचे आहे, असे प्रा. मांडे यांनी नमूद केले.