Headlines

बेळगाव कर्नाटकात आहे म्हणजे काय पाकिस्तानात आहे का?: साहित्य संमेलनाध्यक्ष शरणकुमार लिंबाळेंच्या विधानाने नवा वाद; सीमाभागातून तीव्र निषेध


गेल्या 65 वर्षांहून अधिक काळापासून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी चिवटपणे लढा देत आहे. कर्नाटकी अत्याचार सहन करत आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या पोकळ आश्वासनांना तोंड देत सीमावासियांचा हा संघर्ष अखंड सुरू आहे.

.

‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शरणकुमार लिंबाळे यांनी सीमाप्रश्नावर वादग्रस्त भाष्य केले. बेळगाव कर्नाटकात आहे म्हणजे काय पाकिस्तानात आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर, केवळ बेळगावातच नाही तर तामिळनाडू, केरळपासून ते जगभरातील अनेक देशांत मराठी भाषिक राहतात. मग त्या सर्वांनाही महाराष्ट्रात आणायचे का, असे विधान करत त्यांनी सीमावासियांच्या लढ्याबाबत असंवेदनशील भूमिका मांडली आहे.

बेळगाव प्रश्नी बोलताना शरणकुमार लिंबाळे म्हणाले की, हा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे आणि न्यायदेवता कधी डोळे उघडेल हे मला माहिती नाही. बेळगावमध्ये मराठी माणूस आहे, म्हणून तो भाग महाराष्ट्रात आला पाहिजे असे आपण म्हणतो. पण मराठी माणूस फक्त बेळगावमध्येच आहे असे नाही. मराठी माणूस हा अमेरिका, इंग्लंडसह तामिळनाडू-केरळमध्ये आहे. मराठी माणूस हा संपूर्ण जगभरात आहे. म्हणून काय सगळेच जग आपण महाराष्ट्रामध्ये आणणार आहोत का? तसे आपण करू शकत नाही, असे विधान लिंबाळे यांनी केले आहे.

तसेच बेळगाव हे पाकिस्तानमध्ये आहे का? बेळगाव हे भारतातच आहे. भारताविषयी आपल्या मनात जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम हे बेळगावमधील कन्नड माणसांबद्दल असले पाहिजे. माझी मातृभाषा कन्नड होती, पण ती मी विसरून गेलो आहे. ज्या भागात आपल्याला राहायचे आहे त्या भागाची भाषा आणि संस्कृती आपण शिकली पाहिजे.

माफी आणि राजीनाम्याची मागणी

शरणकुमार लिंबाळे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सीमाभागातून तीव्र निषेध केला जात आहे. लिंबाळे यांनी सीमाभागातील समस्त मराठी भाषकांची जाहीर माफी मागावी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा

जर साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेतली नाही, तर येत्या काळात समस्त बेळगावकरांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. या संदर्भात साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनाही लेखी निवेदन पाठवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *