![]()
पुण्यात अभिनेते अरुण नलावडे आणि अंजली नलावडे यांना यशवंत-वेणू पुरस्काराने गौरवण्यात आले. सत्काराला उत्तर देताना अरुण नलावडे यांनी कुरघोड्या आणि शत्रुत्वाऐवजी गरजू व उपाशी लोकांना मदत करण्याची वृत्ती जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे ९वे वर्ष आहे. अरुण नलावडे म्हणाले, कौतुकाची थाप देणारी व्यक्ती अदृश्य रूपात पाठीशी असते. यशाच्या वाटचालीत कोणीतरी पुढे नेल्याची जाणीव महत्त्वाची असते. या टप्प्यावर पत्नीच्या साथीची जाणीव होत असून, संकटात दुसऱ्याच्या आधाराने माणूस सावरतो. माणसांमधील हा जिवंतपणा टिकणे गरजेचे आहे. नाट्यसंस्कार कला अकादमीचे संस्थापक प्रकाश पारखी यांना जीवनगौरव पुरस्कार, तर पडद्यामागील कलाकार अशोक सोनावळे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. माजी आमदार आणि निरुपणकार उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. नगरसेवक पृथ्वीराज सुतार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष समीर हंपी, प्रमुख कार्यवाह सत्यजित धांडेकर आणि कोषाध्यक्ष दीपक गुप्ते मंचावर होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि धनादेश असे होते. कवी व गीतकार वलय मुळगुंद यांनी मानपत्र लिहिले. अरुण नलावडे यांनी थोर व्यक्तींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार नवी चेतना आणि ऊर्जा देतो, असे सांगितले. कोथरूड शाखेच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. सजग आणि सक्षम समाजाने सकारात्मक गुण जिवंत ठेवावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. कलाकारामागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या कुटुंबीयांच्या कामाची दखल या पुरस्कारातून घेतली जाते, हे मोलाचे आहे, असे अंजली नलावडे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांच्या नात्याविषयी बोलताना उल्हास पवार म्हणाले, राजकारणासारख्या कोरड्या क्षेत्रात असूनही यशवंतराव चव्हाण भावनिक आणि मृदू स्वभावाचे होते. त्यांचे पत्नी वेणूताईंवर खूप प्रेम होते. आयुष्यातील कठीण प्रसंगांत वेणूताईंनी दिलेल्या साथीबद्दल ते कृतज्ञ होते. अरुण नलावडे आणि सामाजिक भान असलेल्या अंजली नलावडे यांना हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद असल्याचे उल्हास पवार यांनी सांगितले.
Source link
अरुण-अंजली नलावडे यांना यशवंत-वेणू पुरस्कार:कुरघोड्या, शत्रुत्वाऐवजी गरजूंना मदत करा, अरुण नलावडे यांचे आवाहन