Headlines

माहीम गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा:बिश्नोई गँगच्या नावाने ज्वेलर्सला 10 कोटींची खंडणी मागितली, धमकीनंतर दुकानावर गोळीबार




मुंबईतील माहीम परिसरात पीसी जैन ज्वेलर्सवर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुकानाचे मालक भरत मेघराज जैन यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्वेलर्स मालकाने आपल्याला आलेली धमकी बिश्नोई गँगकडून असल्याचा दावा केला आहे. 10 कोटींची खंडणी उकळण्यासाठी धमक्या देण्यात आल्या आणि त्यानंतर थेट दुकानावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबईतील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून माहीम पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. माहीममधील पीसी जैन ज्वेलर्सवर 25 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हा गोळीबार झाला. दुकान सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुकानाच्या दिशेने 2 ते 3 राऊंड फायरिंग केली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या गोळीबारात दुकानाच्या काचेच्या दरवाजाचे नुकसान झाले. गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. त्यांनी वांद्रेच्या दिशेने पळ काढल्याची माहिती दुकानाचे मालक भरत जैन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. 18 ऑक्टोबरपासून धमकीचे मेसेज, 31 ऑक्टोबरला 10 कोटींची मागणी या प्रकरणात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार होण्याच्या अनेक दिवस आधीपासूनच ज्वेलर्स मालकाला धमक्या दिल्या जात होत्या. भरत मेघराज जैन यांच्या तक्रारीनुसार, 18 ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून त्यांना धमकीचे फोन आणि व्हॉट्सॲप मेसेज येत होते. सुरुवातीला हे मेसेज स्पॅम असावेत, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, 31 ऑक्टोबर रोजी त्यांना थेट 10 कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या धमक्यांमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय ज्वेलर्स मालकाने व्यक्त केला आहे. मात्र, धमकी देणारे नेमके कोण होते आणि त्यांचा बिश्नोई गँगशी प्रत्यक्ष संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. खंडणीची मागणी केल्यानंतरही पैसे न मिळाल्यानेच दुकानावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दुचाकीवर बनावट नंबर प्लेट, चेसिस नंबरही पुसला गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासात हल्लेखोरांनी आपली ओळख लपवण्यासाठी विशेष खबरदारी घेतल्याचे समोर आले आहे. गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर दुचाकीचा चेसिस नंबरही पुसून टाकण्यात आला होता. त्यामुळे ही दुचाकी कोणाच्या मालकीची आहे आणि ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली, याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही हल्लेखोरांनी हेल्मेट घातल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस इतर तांत्रिक पुराव्यांची मदत घेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर आरोपींनी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी सोडून दिली. त्यानंतर त्यांनी रेल्वेने बोरिवलीच्या दिशेने प्रवास केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आरोपींनी दुचाकी सोडून रेल्वेचा मार्ग निवडल्यामुळे त्यांच्या हालचालींचा माग काढण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाण्याची शक्यता आहे. हल्लेखोरांना पुन्हा पाहिल्यास ओळखू शकतो, ज्वेलर्स मालकाचा दावा दुकानाचे मालक भरत मेघराज जैन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दोन्ही हल्लेखोरांचे वर्णन सांगितले आहे. आरोपी पुन्हा समोर आल्यास त्यांना ओळखू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. 10 कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी कट रचण्यात आला आणि त्याचाच भाग म्हणून दुकानावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, व्हॉट्सॲप मेसेज, सीसीटीव्ही फुटेज आणि दुचाकीचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. गोळीबार करणारे शूटर्स नेमके कोण आहेत, त्यांना कोणी सुपारी दिली होती आणि या कटामागे खरोखरच बिश्नोई गँगचा संबंध आहे का, या दिशेने तपास सुरू आहे. मुंबई आणि पुण्यातील गोळीबाराच्या घटनांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल दरम्यान, मुंबईतील माहीम आणि पुण्यातील गोळीबाराच्या घटनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही घटनांबाबत त्यांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितला गोळीबाराचा थरार माहीममधील गोळीबाराच्या घटनेनंतर एका प्रत्यक्षदर्शीनेही महत्त्वाची माहिती दिली आहे. दोन जण दुचाकीवरून आले होते. दोघांनीही जॅकेट घातले होते. अचानक गोळीबार सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांतच हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. एकीकडे व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितली जात असल्याचे आरोप, तर दुसरीकडे खंडणी न दिल्यास थेट गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मुंबईतील व्यापारी आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माहीममधील या गोळीबारामागील सूत्रधार कोण, 10 कोटींच्या खंडणीची मागणी कोणी केली आणि बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, याची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत. हेही वाचा…. शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल:15 दिवसांपूर्वीही बिघडली होती प्रकृती, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सोडून तातडीने रुग्णालयात पोहोचल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. पवार यांची प्रकृती सध्या उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक अर्धवट सोडली आणि तातडीने ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यामुळे राजकीय वर्तुळातही या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *