भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून, कल्याण डोंबिवली रनर्स (KDR) यांच्या पुढाकाराने आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने आयोजित ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2026’चे तिसरे पर्व उत्साहात
.
कल्याण-डोंबिवलीसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, शिर्डी, सिन्नर आणि जुन्नर अशा महाराष्ट्रातील विविध भागांतून धावपटू या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पहाटेपासूनच धावपटूंच्या उत्साहाने डोंबिवलीचे रस्ते चैतन्यमय झाले होते. सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी 21.1 किमी हाफ मॅरेथॉन, 10 किमी आणि 5 किमी टाईम रन, तसेच 5 किमी आणि 1.6 किमी फन रन अशा विविध धावश्रेणींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. आमदार रविंद्र चव्हाण यांनी स्वतःही सहभागी होत धावपटूंचा उत्साह वाढवला.

या स्पर्धेत 21 किमी हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात संदीप कुमार, शिवम यादव आणि नीरज निषाद यांनी, तर महिला गटात साक्षी पवार, खुशबू बाघेल आणि विजयालक्ष्मी राजभर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय, 21 किमी स्पर्धेत 1 तास 11 मिनिटे, तर 10 किमी स्पर्धेत 32 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवण्यात आली.
डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख जपत शहरात क्रीडा संस्कृती रुजवणे, नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे आणि युवा पिढीला मैदानी खेळांकडे आकर्षित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. अनुभवी धावपटूंना आपली क्षमता सिद्ध करण्याचे व्यासपीठ आणि नवोदितांना धावण्याची संधी उपलब्ध करून देतानाच विविध वयोगटांतील नागरिकांना एकत्र आणणारा हा उपक्रम डोंबिवलीच्या सामाजिक एकतेचेही प्रतीक ठरला.


या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. युवा पिढी नशामुक्त असली पाहिजे. नशामुक्त भारत घडवण्यासाठी तरुणांनी मैदानी खेळांकडे वळणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी, क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळावी आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार व्हावा, यासाठीच या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून 9 हजारांहून अधिक धावपटूंचा उदंड प्रतिसाद मिळाला, याचा विशेष आनंद आहे.”