![]()
प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा शिवारात विहिरीतील मलबा काढणारी साबडे अंगावर पडून एक मजूर ठार झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे रायगड हॉटेलच्या पाठीमागे गट नंबर १० मध्ये शरद भोपळे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. राजपूत ठेकेदारामार्फत काम चालू होते. विहीर ९० ते १०० फुटांपर्यंत झाली होती. सर्जेराव चिंधा पवार (४६), दीपक ताठे (दोघे रा. वाघला ता. वैजापूर), विहिरीतून मलबा भरून देत होते. त्याच वेळी क्रेनला अचानक झटका बसला. वायर रोप तुटला. बकेट खाली असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळली. दोघेही गंभीर जखमी झाले. क्रेन ऑपरेटर राजपूत, लक्ष्मण पवार यांनी आरडाओरड केली. मदतीसाठी नागरिकांना बोलावण्याचा प्रयत्न झाला. कामाचे ठिकाण खोल होते. परिसर निर्जन होता. अथक प्रयत्नांनंतर एक तासाने जखमींना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार झाले. पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी हलवण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर संबंधित ठेकेदार, विहिरीचे मालक यांनी छत्रपती संभाजीनगरऐवजी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. श्रीरामपूरजवळ सर्जेराव पवार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. अहिल्यानगर येथे शवविच्छेदन झाले नाही. त्यामुळे मृतदेह छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.
Source link
विहिरीत साबडे कोसळले, मजूर ठार; दुसरा गंभीर जखमी:वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील घटना