![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज हभप संग्राम भंडारे व काही गोरक्षकांनी आज सकाळी 10 च्या सुमारास शाईफेक करण्यात आली. विकास लवांडे गत काही दिवसांपासून वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा मुद्दा लावून धरला होता. त्यांनी या प्रकरणी घुसखोर ‘हभप’ची एक यादीही जाहीर केली होती. यामुळे चिडलेल्या संग्राम भंडारे व त्यांच्या समर्थकांनी आज त्यांच्यावर हल्ला करून शाईफेक केली. या घटनेचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. विकास लवांडे आळंदी मातोबा तालुका हवेली येथे प्रवचनासाठी गेले होते. तेथील प्रवचन संपल्यानंतर सकाळी 10 वा. ते परत येत होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली. विकास लवांडे यांनी हल्लेखोरांनी आपल्याला पिस्तुल दाखवत जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेनंतर लवांडे यांनी तत्काळ लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात जाऊन संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पुणे पोलिस आयुक्तांनी माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त केल्याशिवाय आपण पोलिस स्टेशन सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. विकास लवांडे यांनी काय सांगितले? विकास लवांडे यांनी हा हल्ला झाल्यानंतर एक व्हिडीओ जारी करत घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, “आज सकाळी माझे आळंदी येथे दशक्रियेच्या कार्यक्रमानिमित्त प्रवचन होते. ते प्रवचन संपल्यानंतर मी पुण्याच्या दिशेने निघालो. वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि 10-15 गोरक्षक होते. त्यांच्या दोन – तीन गाड्या होत्या. या सगळ्या गुंडांनी मला निर्जनस्थळी अडवले. मला गाडीतून खाली उतरवून माझ्या अंगावर शाईच्या दोन-तीन बाटल्या ओतल्या. मला धक्काबुक्की केली. त्यातील दोघांकडे बंदुका होत्या. ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते.
वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा नेमका वाद काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखाद्वारे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, वारकरी संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी होत आहे. समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या वारकरी चळवळीत अशा विचारांची वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही काही पुरोगामी विचार मांडणाऱ्या व्यक्तींची नोंद घेण्याचे काम सुरू केले आहे. सध्या सुमारे 40 जण असे दिसून येतात की जे कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून प्रगत विचार मांडत आहेत. अशा लोकांची संख्या वाढणे आवश्यक असून, समाजप्रबोधनासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. याचवेळी शरद पवार यांनी वारकरी चळवळीत महिलांचा अभाव असल्याची खंतही व्यक्त केली होती. प्रबोधनाच्या या प्रवाहात महिलांचा सहभाग फारसा दिसत नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. समाजातील सर्व घटकांचा यात समतोल सहभाग असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते. शरद पवारांच्या या भूमिकेनंतर विकास लवांडे यांनी अशा लोकांची कथित पोलखोल करत आहेत. त्यांनी या प्रकरणी कथित घुसखोरांची एक यादीही जाहीर केली होती. त्यात चैतन्य महाराज देगलूरकर यांच्यासह अनेकांची नावे होती. ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असेच छळले – रोहित पवार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत. या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी, असे ते म्हणालेत. हल्लेखोरांना कुणाचा वरदहस्त हे उघड – सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विकास लवांडेंवर हल्ला करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे उघड आहे अशी भावना व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार (@NCPspeaks) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे. भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे, असे त्या म्हणाल्या.
Source link
NCP शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक:संग्राम भंडारे, गोरक्षकांचे कृत्य; वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा वाद चिघळला