Headlines

अखेर ब्लेडने गळा चिरलेल्या तरुणीचा मृत्यू:प्रियकरावर खुनाचा गुन्हा, दहा दिवसांपासून रुग्णालयात सुरू होते उपचार




प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा अखेर उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर दिलीप राठोड (वय २२, रा. हिंगोली) याला अटक केली आहे. उजालादेवीचा भाऊ भगतसिंग (वय २५) याने चंदननगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली होती. चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोडविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजालादेवी आणि आरोपी राठोड हे विमाननगरमधील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते, जिथे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. २९ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी राठोड चंदननगरमधील पठारे वस्ती परिसरात आला. त्यावेळी उजालादेवीचा भाऊ आणि वहिनी कामावर गेले होते. राठोड तिच्या घरात शिरला आणि तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून त्याने ब्लेडने तिचा गळा चिरला आणि घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या उजालादेवीला रहिवासी आणि पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपी राठोडला हिंगोली परिसरातून अटक केली. उजालादेवीने लग्नास नकार दिल्याने आणि तिचे लग्न ठरल्याने राठोड तिच्यावर चिडला होता. याच वादातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत्यूच्या दाढेतून भावाला व्हिडीओ कॉल हल्ला झाल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गळा चिरलेला असल्याने तिला नीट ओरडताही येत नव्हते. अशाही परिस्थितीत तिने कमालीचे धैर्य दाखवत आपल्या भावाला फोन केला. “दादा, मला एका मुलाने मारलंय, गळ्यातून आवाज येत नाहीये, तू लवकर घरी ये…” इतके बोलून तिने भावाला व्हिडीओ कॉल केला. समोर आपली बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पाहून भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. कागदावर नाव लिहून दिली साक्ष जखमी तरुणीला जेव्हा पोलीस आणि डॉक्टरांनी विचारले की ‘हल्ला कोणी केला?’, तेव्हा जखमेमुळे तिला बोलणे अशक्य होते. तिने केवळ खुणेने कागद आणि पेन मागितला. थरथरत्या हाताने तिने त्या कागदावर आरोपीचे नाव— ‘दिलीप राठोड’ असे लिहिले आणि गुन्हेगाराचा चेहरा समोर आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *