Headlines

"फिरोदिया युनायटेड' व "गुलमोहर'ची अंतिम फेरीत धडक:उपांत्य फेरीतील सामन्यांत रंगला फुटबॉलचा थरार, नगरकरांची वाढली गर्दी‎




शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने अत्यंत रंगतदार व चुरशीचे झाले. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीतील लढतींमध्ये फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. आता या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांच्यात झाला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक आणि बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत एकमेकांना झुंज दिली. मैदानावर चेंडूसाठी चुरस, जलद पासिंग आणि गोल करण्यासाठी दोन्ही संघांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे सामना अत्यंत रोमांचक झाला. संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे निकालासाठी टायब्रेकरचा आधार घ्यावा लागला. टायब्रेकरमध्ये फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड संघाने संयम राखत अप्रतिम कामगिरी केली आणि ४-२ अशा फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्‍चित केला. फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड संघाकडून उत्कर्ष सोनवणे, भानुदास चंद, नील धेंडवाल आणि अनोश कामाठी यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी संघाकडून निकोलस आणि रोनाल्ड यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. दुसरा उपांत्य फेरीतील सामना फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लब आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब यांच्यात रंगला. सामना सुरू झाल्यापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लबच्या खेळाडूंनी सुरेख समन्वय आणि शिस्तबद्ध बचावाच्या जोरावर सामन्यावर पकड ठेवली. सामन्याच्या पंधराव्या मिनिटाला परेश म्याना याने गोल करत गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लबला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबने बरोबरीसाठी अनेक आक्रमणे केली, मात्र गुलमोहरच्या बचाव फळीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिला नाही. अखेरीस १-० अशा फरकाने विजय मिळवत गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लबने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. आता अंतिम फेरीतील सामन्यांकडे लक्ष अंतिम फेरीत फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत विजेता कोण होणार याची नगरकर प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *