![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी अजित पवारांच्या निधनानंतर टीकेचे धनी ठरलेल्या तटकरे कुटुंबाचे कौतुक केले. अदिती तटकरे ही माझी मुलगी म्हणून कोकणात काम पाहते. अजित पवारांचे तटकरे कुटुंबावर खूप प्रेम होते. तेवढेच प्रेम माझेही त्यांच्यावर राहील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कौतुकानंतर तटकरे कुटुंबावर होणारी टीकेची धार बोथट होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी आज रायगड जिल्ह्यातील रोहा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी तटकरे कुटुंबाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अजित पवार यांच्यानंतर येथील विकासकामांच्या कार्यक्रमासाठी बोलावून जो पायडा ठेवला तो असाच पुढे सुरू राहील. रोहा येथील विकासकामांमुळे येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येथे अदिती तटकरे माझी मुलगी म्हणून काम पाहते. दादांनंतर महाराष्ट्राची जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहे. दादांसारखेच माझेही तटकरे कुटुंबावर तेवढेच प्रेम राहील. अजित पवारांच्या आठवणीने भावूक सुनेत्रा पवार यावेळी अजित पवारांची आठवण काढताना काहीशा भावूकही झाल्या. रायगड हा केवळ जिल्हा नाही. ही शिवराज्याभिषेक झालेली पावन भूमी आहे. कोकण म्हणजे कष्टाळू माणसाने घडवलेली साक्षात देवभूमी आहे. दादांचे कोकणावर विशेष प्रेम होते. कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा कणा आहे. मी व दादा सहलीला निघालो की, कोकणालाच आमचे पहिले प्राधान्य असायचे, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठली होती. विशेषतः राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. पण आता स्वतः सुनेत्रा पवारांनीच त्यांचे कौतुक केल्यामुळे विरोधकांच्या टीकेची धार बोथट झाली आहे. सुनेत्रा पवार भारताच्या पहिल्या वहिनी ठरतील – तटकरे सुनेत्रा पवारांच्या भाषणानंतर सुनील तटकरे यांनीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, कोकण भविष्यात गोव्यालाही मागे टाकेल. रायगडला येणारे पर्यटक गोव्याला विसरून कोकणात येतील असे प्रकल्प भविष्यात जिल्ह्यात उभे राहतील. अजितदादांच्या उपस्थितीशिवाय आजपर्यंत रोहा शहरातील एकही काम झाले नाही. त्यांचे विकासाभिमुख नेतृत्व महाराष्ट्राने अनुभवले. महाराष्ट्राने वसंतदादा पाहिले, दादा पाहिले आता विकासदृष्टी ठेवणाऱ्या वहिनींचे काम पाहतील. आज तुमचे स्वागत करताना एका डोळ्यात अश्रू आहेत. पण सुनेत्रा पवार यांची ओळख भारताच्या पहिल्या वहिनी म्हणून होईल यात शंका नाही. कोकणाला निसर्ग चक्रिवादळाचा तडाखा बसला. तेव्हा अजित पवारांनी भरघोस मदत केली होती. ते नेहमीच राज्याच्या हिताचा आढावा घ्यायचे. जातपात न मानणारा नेता म्हणजे अजितदादा. त्यांच्यासारखे मनमिळावू व हसवणारे नेते होणे नाही. बारामती हे रोल मॉडेल असून देशातील पहिले मॉडेल असल्याचा उल्लेख आतापर्यंत अनेक नेत्यांनी केला. त्याचे श्रेय दादांनाच जाते. सुनील तटकरे यावेळी अजित पवारांची आठवण काढताना म्हणाले, एकदा आम्ही मध्यरात्री 2 वा. बारामतीत फिरत होतो. तेव्हासुद्धा झाडांना पाणी घालण्याचे काम सुरू होते. त्यातून दादांचा धाक दिसत होता. ते करड्या आर्थिक शिस्तीचे होते. विकासात्मक दृष्टिकोनातून नेहमीच काटेकोरपणे राहायचे. त्यांनी दिवेआगर येथील मूर्ती चोरी प्रकरण वेगवान पद्धतीने हाताळले. त्यामुळेच आज तशीच मूर्ती सर्वांपुढे आहे. रायगड जिल्ह्यात दादांच्या नेतृत्वात यश मिळवता आले. आज वहिनींच्या हस्ते झालेली विकासकामे खरेतर एक सुरुवात आहे. देशाच्या पहिल्या वहिनी ह्या सुनेत्रा पवार आहेत, असे ते म्हणाले.
Source link
अजितदादांसारखेच माझे तटकरे कुटुंबावर प्रेम:अदिती तटकरे माझी मुलगीच – सुनेत्रा पवार; सुनील तटकरेंनीही केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक