Headlines

मंत्र्यांची ईव्ही खरेदीची चमकोगिरी, पण सर्वसामान्यांचे काय?:बेस्ट आणि मेट्रोचे तिकीट स्वस्त होणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे आवाहन केल्यानंतर, राज्यातील मंत्री आणि सत्ताधारी आमदार आपल्या कामकाज आणि दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “आमच्या सरकारने २०२१ मध्ये आणलेले ई-वाहन धोरण या सरकारने बासनात गुंडाळले असून, आता केवळ प्रसिद्धीसाठी आणि ‘फोटो सेशन’साठी मंत्री आणि आमदारांकडून ई-वाहने खरेदी केली जात आहेत,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “२०२१ मध्ये आमच्या सरकारने महाविकास आघाडीच्या काळात एक महत्त्वाकांक्षी ई-वाहन धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार, २०२२ पासून सर्व मंत्री, सर्व सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन गाड्या खरेदी करायच्या असल्यास किंवा भाड्याने घ्यायच्या असल्यास केवळ इलेक्ट्रिक वाहनेच घेण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदींकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले.” स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जेचा विसर केवळ इलेक्ट्रिक गाड्या वापरणे पुरेसे नाही, तर त्यासाठी लागणारी वीज ही परवडणाऱ्या दरात असावी आणि ती ‘क्लीन एनर्जी’ म्हणजेच सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या स्वच्छ स्त्रोतांकडून मिळावी, अशी तरतूदही त्या धोरणात होती. मात्र, आजच्या घडीला ही बाब म्हणजे एक विस्मरणात गेलेली गोष्ट ठरली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मंत्र्यांची चमकोगिरी, पण सर्वसामान्यांचे काय? सत्ताधारी पक्षाचे काही मंत्री आणि आमदार सध्या रातोरात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करून फोटो काढत आहेत, हे पाहून चांगले वाटते. मात्र, ज्यांना स्वतःची ई-वाहन खरेदी करणे परवडत नाही, अशा सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सरकार केवळ स्वतःच्या सोयीचे राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. सार्वजनिक वाहतुकीबाबत टोकदार प्रश्न मंत्र्यांच्या गाड्यांचे ताफे कमी करणे आणि ई-वाहने वापरणे हे केवळ वैयक्तिक पातळीवर न राहता त्याचा फायदा जनतेला मिळायला हवा, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी सरकारला काही थेट प्रश्न विचारले आहेत. ‘बेस्ट’ बसची तिकिटे पुन्हा स्वस्त होणार का? इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सरकार अनुदान देऊन सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य करणार का? मुंबई मेट्रोच्या तिकीट दरात कपात होणार का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *