.

जळगाव दिवाळीतील भाऊबीज हा नात्याचे बंध जपणारा उत्सव. या दिवशी बहिणीला भावाला ओवाळण्याची आतुरता असते. लहानपणीच्या भाऊबीजेच्या आठवणी अनेकांच्या मनात आजही ताज्या आहेत. काळ बदलला. आयुष्याचे व्याप वाढले. नोकरी. संसाराच्या जबाबदाऱ्या. मुलांचे संगोपन. बदललेली जीवनशैली. या मुळे अनेक बहीण-भावंडांना सणासुदीला एकत्र येणे शक्य होत नाही. घरातील जबाबदाऱ्यांमुळे वेळ काढता येत नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी फोनवरून विचारपूस होते. यातच समाधान मानावे लागते. भाऊबीजेच्या निमित्ताने ज्येष्ठ भावंडांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
इतरांचे जीवन प्रकाशमय करण्यातच आनंद ^दिवाळी हा रोषणाईचा सण असल्याने या काळात आमची जबाबदारी अधिकच वाढते. कुठेही वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने सुरळीत व्हावा, यासाठी आम्हाला दिवाळीतही सुट्टी मिळत नाही. कुटुंबासोबत सण साजरा करण्याची इच्छा असली तरी आमच्या कामाचे महत्त्व लक्षात घेता आम्ही परिस्थितीनुसार जबाबदारी पार पाडतो. बहिणी भावाला ओवाळताना पाहिल्यावर या नात्याची उणीव जाणवते. स्वतःचाआनंद बाजूला ठेऊन इतरांची दिवाळी प्रकाशमय करण्यात आनंद वाटतो. – कृषिका गोंडाणे, विद्युत सहायक. फोनवरूनच एकमेकांना शुभेच्छा ^मी नांदगाव येथे राहते, तर माझा भाऊ वरूड येथे राहतो. पूर्वी प्रत्येक भाऊबिजेला आम्ही आवर्जून भेटायचो. बहिणीने भावाला ओवाळणे, एकत्र बसून गप्पा मारणे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणे, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असायचा. मात्र, आता वयोमानानुसार आजारपणामुळे प्रवास करणे शक्य होत नाही. भाऊबीजेचा दिवस आला की आजही भावाला भेटण्याची ओढ लागते. या दिवसाची मी वर्षभर वाट पाहते; पण प्रवासाचा त्रास सहन होत नसल्याने फोनवरूनच भावाशी बोलून भाऊबीज साजरी केली. – ललिता ठाकरे, नांदगाव.